
नाशिक : नांदगाव तालुक्यात पेरण्यांना वेग
बाणगाव बुद्रुक (जि. नाशिक) : प्रदीर्घ कालावधीनंतर नांदगाव तालुक्यात सर्वदूर दोन दिवसांपासून पावसाने बुधवारी व गुरुवारी दमदार हजेरी (Heavy rain) लावली. यामुळे खोळंबलेली पेरणीची (sowing) कामे सुरू झाली आहेत. आजपर्यंत तालुक्यात १२० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. (Sowing started speedily in Nandgaon taluka Nashik News)
जून महिना संपत आला असतानादेखील तालुक्यात पावसाने ओढ दिल्यामुळे बळीराजा हताशपणे आकाशाकडे डोळे लावून बसला होता. दोन दिवसांपासून तालुक्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून, खोळंबलेल्या पेरणीच्या कामांना आता गती मिळणार आहे. तालुक्यात खरीप हंगामात मुख्यत्वे मका, कापूस, बाजरी, मूग आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. बागायती भागात यापूर्वीच पेरणी करण्यात आली आहे. कोरडवाहू शेतीत पेरणीपूर्वी करावयाच्या मशागतीची कामे यापूर्वीच झाली आहेत. शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट पाहत होते. लांबलेल्या पावसामुळे शेतकरीवर्ग बियाणे खरेदी करण्यास धजावत नसल्याचे चित्र बाजारपेठेत होते. परंतु, दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, शेतांमध्ये वापसा होताच पेरण्यांच्या कामांना सुरवात होणार आहे.
जून महिन्यात नांदगाव तालुक्यात आजपर्यंत १२० मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. मध्यंतरी पावसात खंड पडल्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात शेतकरी सापडला होता. परंतु, २२ व २३ जूनला झालेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. उर्वरित क्षेत्रात पेरणीचे कामे सुरू झाली आहेत.
हेही वाचा: संविधानाचे संवर्धनच नव्हे, तर साक्षरताही गरजेची
"२५ जूनपर्यंत नांदगाव तालुक्यात १७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर कपाशी, मूग, मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन पिकांची पेरणी झाली आहे. शेतकरी बांधवांनी आंबा, पेरू, डाळिंब, लिंबू या फळपिकांची लागवड वाढविणे आणि जैविक खतांची बीजप्रक्रिया करण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा." - जगदीश पाटील, तालुका कृषी अधिकारी, नांदगाव
हेही वाचा: Nashik : उन्हाळ कांद्याचा बाजारभाव कमाल 1700, तर सरासरी 1200 रुपये
Web Title: Sowing Started Speedily In Nandgaon Taluka Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..