esakal | सोयाबीन बियाणे 2 वर्षांपर्यंत वापरा; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

बोलून बातमी शोधा

 soya bean
सोयाबीन बियाणे 2 वर्षांपर्यंत वापरा; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक आहे. या पिकाचे वाण हे सरळ वाण असल्यामुळे दर वर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे हे आगामी दोन वर्षांपर्यंत वापरावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे यांनी पत्रकान्वये केले आहे.

काय काळजी घ्याल?

देवरे यांनी पत्रकात म्हटले आहे, की शेतकऱ्यांनी स्वत:जवळील बियाणे वापरल्यास उत्पादनखर्च कमी होईल. गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित झालेल्या सोयाबीन बियाणे चालू वर्षी बियाणे म्हणून शेतकरी पेरणीसाठी वापरू शकतात. तसेच ग्रामबिजोत्पादन, पीक प्रात्याक्षिके योजनांतर्गत आलेल्या उत्पन्नातून बियाण्यांची निवड करता येईल. प्रमाणित बियाण्यांपासून आलेल्या उत्पादनातून चाळणी करून चांगल्या प्रतीचे सोयाबीन बियाणे निवडावे. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असून, त्याचे बाह्य आवरण पातळ असते. त्यामुळे त्यांची उगवणक्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना काळजी घ्यावी. बियाणे साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण दहा ते बारा टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. साठवणुकीसाठी प्लॅस्टिक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठविताना त्यांची थप्पी सात फुटांपेक्षा जास्त नसावी. बियाणे हाताळताना जास्त प्रमाणात आदळआपट करू नये.

पेरणी करताना..


प्रतिहेक्टर बियाणे दर ७५ किलोवरून ५० ते ५५ किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीचा किंवा प्लँटरचा वापर करून पेरणी करावी. सोयाबीनची उगवण्याची क्षमता ही ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरावे. पावसाचे प्रमाण ७५ ते शंभर मिलिमीटर झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. बियाण्यांची पेरणी तीन ते चार सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास तीन ग्रॅम थायमरची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी.रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति दहा ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावी नंतर त्याची पेरणी करावी. शेतकऱ्यांनी आपल्याजवळ साठवलेले सोयाबीन बियाणे पेरणीसाठी राखीव ठेवावे. उर्वरित बियाणे परिसरातील शेतकरी बांधवांना बियाणे म्हणून विक्री करावी.
- गोकुळ अहिरे, तंत्र अधिकारी, मालेगाव