पान-४ मेन
फोटो- 00822
लामकानीमार्गे कोंडाईबारी व दोंडाईचाकडे जाणारा मुख्य रस्ता.
मृत्यूचा सापळा बनलेल्या रस्त्यावर गतिरोधकांची मागणी
भरधाव वाहनांमुळे अपघातांचे सत्र सुरूच; ग्रामस्थांमध्ये संताप
सकाळ वृत्तसेवा
लामकानी, ता. १८ : गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाढत्या अपघातांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, मंगळवारी (ता. १७) वाहनाच्या जोरदार धडकेत ठाणसिंग राऊळ यांचा जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर गावातील रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांमुळे या मार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे.
......
निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असून, अनेकांना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागत आहे. ११ नोव्हेंबरला भाऊबीजेच्या दिवशी राहुल धनीराम कुशवाह या तरुणाला वाहनाने धडक दिल्याने तो जखमी झाला होता. अशा छोट्या-मोठ्या अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लामकानीमार्गे सरवड ते कोंडाईबारी तसेच मालेगाव ते दोंडाईचा हे रस्ते महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांतील वाहतुकीसाठी सोयीचे असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. विशेषतः जड वाहने आणि ट्रक रात्रंदिवस भरधाव धावत असतात. गावातून जाणाऱ्या या मार्गावर वर्दळ असूनही आवश्यक ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघात होतात. त्यामुळे गावाच्या वाहतूक पट्ट्यात ठिकठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी जोर धरत आहे.
बाजारपेठेचे गाव असलेल्या लामकानीत बोरिस चौफुली ते बसस्थानक आणि पुढे सैताळे चौफुलीपर्यंत सुमारे दीड किलोमीटरच्या रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांची दुकाने आहेत. या भागात नागरिकांची मोठी वर्दळ असते. अपघातांचे गांभीर्य लक्षात घेऊन या संपूर्ण पट्ट्यात ठिकठिकाणी गतिरोधक बसविण्याबाबत अडीच वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रस्ता तयार करणाऱ्या कंपनीकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र, संबंधितांकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता अपघातात नागरिकांचा जागीच मृत्यू होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. संबंधित विभागाने तातडीने गतिरोधक बसवावेत; अन्यथा ग्रामस्थ ‘रास्ता रोको’ आंदोलन करतील. तसेच स्वतःच ठिकठिकाणी रस्ता खोदून गतिरोधक तयार करण्याची वेळ येईल, असा इशारा पंचायत समितीचे माजी सदस्य तुषार महाले यांनी दिला.