दिवाळी अंक लेख
---
फोटो - NSK26H33757 महानुभाव
फोटो - हरिहर पांडे
नाशकातील महानुभाव पंथस्थाने
--------------------------
श्रीचक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन पाऊलखुणा
बाराव्या शतकात महानुभाव पंथ प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने महाराष्ट्र पुनित झाला. त्र्यंबकेश्वर ते नांदेडच्या राहेरपर्यन्त १६५० तीर्थस्थाने निर्माण झाली. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक विश्वात या तीर्थस्थानांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. या सर्व तीर्थस्थानांची तपशीलवार नोंद ''स्थानपोथी'' या १३ व्या शतकातील ग्रंथात मिळते.
- हरिहर पांडे
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, अंजनेरी, गोवर्धन (गंगापूर), पंचवटी, अडगाव, सिन्नर, खोपडी, सुकेणे, निफाड, शिवरे, नांदूर, कानळस या ठिकाणी सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पवित्र असलेल्या पाऊलखुणांचे अर्थातच ''स्थानां''चे जतन ८०० वर्षांपासून महानुभावांनी केले. इंच- इंच जागेची भौगोलिक वैशिष्ट्यांसह नोंद ठेवत इतिहास जिवंत ठेवला, ही अभिमानाची बाब आहे.
सिन्नर : सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात सिन्नर येथे आले, सर्वज्ञांचे १० महिन्यांपेक्षा जास्त काळ वास्तव्य राहिले आहे. शहरातील चौदा चौकाच्या वाड्याला त्यावेळी ''भीलमढ'' असे नाव होते. भक्तजनांनी येथे सर्वज्ञांच्या ठायी दवणा पर्व केले.
देवगिरीचा ''महादेव'' राजा सिन्नरला आला. त्याला समजले की, वेरूळला जे पुरुष होते व ज्यांच्या दर्शनाची आपणाला उत्कट इच्छा होती, ते पुरुष येथे आहेत. राजाच्या मनात पुन्हा सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. म्हणून त्याने पाल्हाडांगीयाला शोध घेण्यासाठी पाठविले. पाल्हाडांगीया सिन्नरमधील सर्व देवळे शोधीत शोधीत भीलमढाकडे आला. त्याला वाटले, हे लहान देऊळ आहे. बहुतेक ते पुरुष येथे नसतील. म्हणून आपण आवाराच्या दरवाजापाशी उभा राहिला व सेवकाला आत पाहण्यासाठी पाठविले. त्या वेळी सर्वज्ञ येथे पटीशाळेवर खांबाच्या आड गुजराथी वेष धारण करून उभे होते. सेवकाने विचारले, "येथे श्रीचांगदेवराऊळ गोसावी आहेत का ?" सर्वज्ञ म्हणाले, "चांगदेवओराऊळ नेणों : ना बांगदेओराऊळ नेणों : म्हातारी एकी छे : ते गांवामाहिं भीक्षा मागण गै छे : यौ सहौ छो:" असे गुजराथी भाषेत उत्तर दिले.
गोंदेश्वर, सिन्नर : सर्वज्ञ भक्तजनांसह विहरणासाठी गोदेश्वराच्या देवळात आले, चौकात आसनस्थ झाले. सर्वज्ञांनी, गोदेश्वराच्या देवळापुढे पद्मेश्वराचे देऊळ कोणी बांधले, याची माहिती भक्तजनांना सांगितली. सिन्नर येथे एकूण १८ स्थाने आहेत.
खोपडी : सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी वावीहून खोपडीला आले. सिन्नर-शिर्डी मार्गालगत ''श्रीदत्त मंदिर'' या नावाने प्रख्यात आहे. स्वामींचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. येथे आणखी तीन स्थाने आहेत.
त्र्यंबकेश्वर : सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी दोन्ही श्रीकरांनी त्र्यंबकेश्वराचे लिंगास विडा अर्पण करून लिंगास स्पर्श केला. त्र्यंबकेश्वर व ब्रह्मगिरी परिसरात एकूण २० स्थाने आहेत.
अंजनेरी : गावातील जैन मंदिरात श्रीचक्रधर स्वामी चरणांकित स्थान असून चौक नमस्कारी आहे.
गंगापूर (गोवर्धन) : सर्वज्ञांच्या वेळी गोदावरी नदीच्या काठावर गदाधराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकात स्थान आहे. येथे एकूण ४ स्थाने होती.
नाशिक : गोदावरी नदीच्या पात्रात शहरातील पंचवटी येथे अहिल्यादेवी होळकर पुलाच्या शेजारी आहे. सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी सुंदरनारायणाच्या देवळात थोडा वेळ थांबल्यानंतर नदीच्या घाटावरील देवळीजवळ उभे राहिले. येथून कपाळेश्वराच्या देवळात गेले. रामनाथी गुंफेत त्यांचे १० दिवस वास्तव्य होते. ‘ढगास्थळी स्थाना''चे जीर्णोद्धारकार्य माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी केले. नाशिक येथे एकूण २८ स्थाने आहेत.
आडगाव : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत हे मंदिर आहे, सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.
सुकेणे : मौजे सुकेणे गावात ''श्रीदत्त मंदिर'' या नावाने स्थान प्रख्यात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे आदित्याचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.
निफाड : सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी सुकेण्याहून निफाडला आले. त्यांचे या ठिकाणी तीन दिवस वास्तव्य होते. येथील स्थाने निफाड स्टेशनरोडच्या पूलाजवळ देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे नरसिंह मढ होता. त्या मढातील हे स्थान होय. निफाड येथे एकूण १२ स्थाने आहेत.
शिवरे : सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी निफाडहून नांदूरला जात असताना गावाच्या पश्चिमेस कादवा नदीच्या पूर्व काठी खांडेभडाड देवतेचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय. सर्वज्ञांच्या वेळी येथे पाणपोई होती.
नांदूरमध्यमेश्वर: सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी निफाडहून नांदूरला आले. गोदावरी नदीच्या दक्षिण काठी बंधाऱ्याजवळ मध्यमेश्वराच्या (महादेवाच्या) देवळाच्या चौकात स्थान असून या परिसरात ७ स्थाने आहेत. तर गावाच्या टेकडीवरील मंदिरातही स्थान आहे.
कानळस : सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी नांदूरहून कानळसला आले. गावालगतच गोदावरी नदीच्या काठावरील देवळात स्थान आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे एल्हणेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. तेथे एकूण ५ स्थाने आहेत.
(लेखक महानुभाव स्थान माहात्म्य अभियान, नागपूरचे समन्वयक आहेत.)