चाळीसगावात १८ पासून श्रीराम कथा सोहळा
खडकी बायपास येथील संकटमोचन हनुमान मंदिरातर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
चाळीसगाव, ता. ३ ः येथील श्री गंगोत्री बाबा एवं सुमतीधाम सेवा ट्रस्ट, संकटमोचन हनुमान मंदिर, खडकी बायपास यांच्यातर्फे १८ ते २४ नोव्हेंबरदरम्यान श्रीराम कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यानिमित्त विविध संत-महंतांच्या उपस्थितीत रामकथा, कलशयात्रा, आरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिग्नल पॉईंट येथे रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत कथा प्रवचन होईल. १८ नोव्हेंबरपासून कथेला प्रारंभ होईल तर २४ नोव्हेंबरला कथापूर्णाहुती होईल. त्या दिवशी सकाळी ११ ते १ या वेळेत धार्मिक कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
१८ नोव्हेंबरला कलशयात्रा
श्रीराम कथा ज्ञानयज्ञानिमित्त १८ नोव्हेंबरला बुधवारी दुपारी दोनला संत तुकाराम महाराज मंदिरापासून कलशयात्रेला प्रारंभ होईल. ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिग्नल पॉईंट येथे पोहोचेल. या कलशयात्रेत भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संत-महंतांची उपस्थिती
या सोहळ्यात श्रीराम कथेचे प्रवक्ते फैजपूर येथील श्री सत्यंध मंदिर संस्थानचे प्रमुख तथा अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दनहरिजी महाराज हे आहेत. या सोहळ्यास येथील सिंधी कॉलनीतील मोहनधाम मंदिराचे महंत श्री गोपालदासजी महाराज, महंत श्री रामदासजी महाराज (नागडोह), योगी श्री दत्तनाथजी (शिरपूर) तसेच सूर्यनारायण मंदिरातील महंत श्री दीपकगिरीजी महाराज यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याप्रसंगी श्री श्री १००८ महामंडलेश्वर श्री वैष्णोदासजी महाराज वासुबाबा (धुळे), श्री ज्ञानेश्वर माऊली (सिद्धेश्वर आश्रम, बेलदारवाडी व रवींद्र महाराज हरणे (मुक्ताईनगर) उपस्थित राहणार आहेत. या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वितेसाठी नगराध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांच्यासह श्याम चैतन्यजी महाराज (जामनेर), महंत गोपालदासजी महाराज (इच्छादेवी मंदिर, चाळीसगाव), महंत गोविंदगिरीजी (जुवार्डी) व श्री रामदूत सुंदरकांड गायन मंडळाचे सहकार्य लाभले आहे. उपस्थितीचे आवाहन आयोजक श्री गंगोत्री बाबा एवं सुमतीधाम सेवा ट्रस्ट, संकटमोचन हनुमान मंदिर, खडकी बायपास तसेच महात्यागी महंत श्री राम रटदासजी, महंत धरमधुरीदास (भरदास), महंत सर बाबा आणि संकटमोचन मंदिर भक्त परिवाराने केले आहे.
---------------------------