‘एसएसबीटी’तर्फे डिसेंबरमध्ये
जळगावात हाफ मॅरेथॉन स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २९ : श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट संचलित एसएसबीटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सतर्फे संस्थेच्या प्रथम चेअरमन व भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एसएसबीटी प्रतिभा हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा २० डिसेंबरला जळगावात आयोजित केली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जी. के. पटनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित पत्रपरिषदेला प्राचार्य डॉ. किरण पाटील, प्राचार्य डॉ. अमोल बाळुंगे, डॉ. कौशिक भट्टाचार्य, प्रा. वाय. के. चित्ते, एम. बी. रावलाणी आदी उपस्थित होते. महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असल्याने हाफ मॅरेथॉन स्पर्धा ‘जळगाव रन्स फॉर फार्मर्स’ या संकल्पनेवर होईल. स्पर्धेतून प्राप्त होणारा निधी मुख्यमंत्री दुष्काळ निवारण सहायता निधीस मदत म्हणून देण्यात येणार आहे.
शहरातील खानदेश सेंट्रल मॉलच्या मैदानावर ही स्पर्धा २१ किमी, १० किमी, ५ किमी व ३ किमी अशा चार श्रेणींमध्ये होईल. स्पर्धेत सहभागींसाठी ३ किमीसाठी स्पर्धकास ३५० रुपये, ५ किमीसाठी ५०० रुपये, १० किमीसाठी ७०० रुपये तर २१ किमीसाठी ९०० रुपये शुल्क असेल. एसएसबीटी संस्थेच्या विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलत असेल. यासाठी नोंदणीला सुरवात झाली आहे.
खानदेश सेंट्रल येथून स्पर्धेला सुरवात होऊन २१ किमीची स्पर्धा सकाळी सहा, १० किमीची स्पर्धा सकाळी साडेसहाला तर ५ किमीची स्पर्धा सात व ३ किमीची स्पर्धा सकाळी साडेसातला सुरू होईल.
चौकट
विजेत्यांना आकर्षक बक्षिसे
स्पर्धेतील २१ व १० किमी या दोन्ही श्रेणीमध्ये प्रथम विजेत्यास ११ हजार, द्वितीय साडेसात हजार व तृतीय विजेत्यास पाच हजार रुपये, मानपत्र, बोधचिन्ह दिले जाईल. महिला व पुरुष या दोघांसाठी पुरस्काराच्या वेगवेगळ्या श्रेणी असतील. तर सर्व स्पर्धकांसाठी दहा लकी ड्रॉद्वारे विजेते काढले जाणार आहेत.