धुळे : पान २ मेन
--
लोगो क्रमांक : एसटी लोगो घेणे.
--
एसटी महामंडळाच्या धुळे विभागाची ‘दिवाळी’
--
२२ कोटींच्या महसुलासह १७ लाख प्रवाशांचा दिवाळीत लालपरीतून प्रवास
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ : ग्रामीण भागाच्या दळणवळणाचा मुख्य कणा असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) धुळे विभागाने यंदाच्या दिवाळी हंगामात उत्पन्नाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ४ ते १५ नोव्हेंबर या बारा दिवसांच्या दिवाळी जादा वाहतूक कालावधीत धुळे विभागाने सवलतीसह तब्बल २२ कोटी १९ लाख ५४ हजार रुपयांचा महसूल मिळवून नवा टप्पा गाठला. गतवर्षीच्या तुलनेत विभागाने एक कोटी ७९ लाख ६९ हजार रुपयांचे जास्तीचे उत्पन्न प्राप्त केले असून या काळात १७ लाख ९६ हजार प्रवाशांनी लालपरीतून सुरक्षित प्रवास केला आहे.
-
दर वर्षी दिवाळीच्या दिवसांत महामंडळातर्फे हंगामी भाडेवाढ केली जाते. मात्र, यंदा प्रवाशांच्या सोयीसाठी ही भाडेवाढ टाळण्यात आली. दुसरीकडे खासगी बसचालकांनी (ट्रॅव्हल्स) तिकीट दरात मोठी वाढ केल्याने सर्वसामान्य प्रवाशांनी एसटीलाच पहिली पसंती दिली. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन धुळे विभागाने नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त जादा बसगाड्यांचे काटेकोर नियोजन केले. यातून विभागाच्या बसने ३५ लाख ३९ हजार किलोमीटरचा पल्ला यशस्वीरीत्या गाठला. धुळे विभागातील सर्व बसस्थानकांवरून पुणे, मुंबई, कल्याण, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, निगडी आणि जळगाव या प्रमुख मार्गांवर जादा गाड्या सोडण्यात आल्या. यामुळे प्रवाशांना परतीचा प्रवास वेळेत आणि सुरक्षित पूर्ण करता आला.
-
सवलत योजनांना प्रतिसाद
या दिवाळी हंगामात महिलांसाठीची ५० टक्के सवलत योजना (महिला सन्मान योजना) आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ''अमृत ज्येष्ठ नागरिक'' योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मोफत प्रवास सुविधेला कौटुंबिक प्रवाशांकडून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर ''आवडेल तेथे प्रवास'' पास योजनेचाही अनेकांनी लाभ घेतला. गर्दीचा अंदाज घेऊन अनेक प्रवाशांनी दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ ऑनलाइन आरक्षण करण्यास प्राधान्य दिले. आगामी काळातही विविध सण, सुट्ट्या आणि यात्रांच्या निमित्ताने अशाच प्रकारे जादा बससेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे वाहतूक विभागातर्फे सांगण्यात आले.
-
१४-१
..चौकट..
१४-१
सांघिक प्रयत्नाचे यश
धुळे विभागाचे विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे यांनी या नियोजनाबद्दल सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना अभिनंदन पत्र देऊन कौतुक केले. चालक व वाहकांनी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन उल्लेखनीय कामगिरी करत वाहतूक सुरळीत पार पाडली. यांत्रिक कर्मचाऱ्यांनी वाहनांची दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून सर्व गाड्या मार्गावर धावण्यासाठी सज्ज ठेवल्या. तसेच आगार व्यवस्थापक, पालक अधिकारी, शाखा प्रमुख आणि प्रशासकीय कर्मचारी यांनी वाहतूक व यांत्रिक विभागाशी योग्य समन्वय साधत गर्दीच्या मार्गावर जादा बसेस पुरविल्या. या सामूहिक प्रयत्नांमुळेच धुळे विभागाला अपेक्षित महसूल मिळाल्याचे विभाग नियंत्रक व्यवहारे यांनी पत्रात नमूद केले.