NSK26H33861
जळगाव : विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांना निवेदन देताना कामगार एसटी सेनेचे पदाधिकारी शिवाजीराव बोर्डे पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी.
----
एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न
सोडवा; अन्यथा आंदोलन
बोर्डे पाटील यांचा विभाग नियंत्रकांना इशारा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २९ : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत, अन्यथा कामगार सेनेला आंदोलन करावे लागेल, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी शिवाजीराव बोर्डे पाटील यांनी दिला. जळगाव विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांच्या दालनात गुरुवारी (ता. २९) कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत महत्त्वपूर्ण बैठक झाली.
कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत आणि सरचिटणीस हिरेन रेडकर यांच्या निर्देशानुसार, मध्यवर्ती कार्यकारिणीचे वरिष्ठ पदाधिकारी शिवाजीराव बोर्डे पाटील, विजय पवार, सुधीर पटवारी, सचिन पटवारी, अमोल गोरे आणि शिवाजी हटकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी कामगार व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. बैठकीत चालक, वाहक, सहाय्यक तसेच अन्य कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन अडचणी, कामाचे स्वरूप आणि तांत्रिक समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी, विश्रांतीगृहाची सुविधा, कामाचे तास तसेच काही अधिकाऱ्यांकडून होणारी मनमानी यांसह विविध प्रश्न मांडण्यात आले. प्रलंबित समस्या मार्गी लावण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. विभाग नियंत्रक बोरसे यांनी या प्रश्नांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. बैठकीचे सूत्रसंचालन गोपाळ पाटील यांनी केले. सागर निकुंभ यांनी प्रास्ताविक, तर प्रशांत मोरे यांनी आभार मानले.