सायबर फसवणुकीपासून
सावध राहण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
देवळा, ता. १३ : ऑनलाइन व्यवहार करताना ओटीपी कोणालाही सांगू नका. अनोळखी लिंक उघडू नका. सायबर फसवणूक झाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांनी केले.
येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात उच्च व तंत्रशिक्षण विभाग, पुणे आणि महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानांतर्गत सायबर सुरक्षेवर व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सतीश ठाकरे होते. वाघ यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण, ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे प्रकार आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञान, अँड्रॉइड मोबाईलचा वाढता वापर आणि जागरूकतेचा अभाव यामुळे सायबर गुन्हे वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून खोटे संदेश, बनावट माहिती आणि फसवणुकीचे नवे प्रकार समोर येत आहेत. सुशिक्षित नागरिकही अशा फसवणुकीला बळी पडू शकतात. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना विशेष खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. उपप्राचार्य डॉ. जयवंत भदाने उपस्थित होते. प्रा. यशवंत खैरनार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. प्रा. चंद्रकांत दाणी यांनी आभार मानले.
देवळा : सायबर सुरक्षा व्याख्यानात बोलताना पोलीस निरीक्षक कैलास वाघ, प्राचार्य डॉ.सतीश ठाकरे, प्रा.जयवंत भदाणे आदी.