फोटो : H34663
किरमिरा (पाडवीपाडा) : आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ वाटपाप्रसंगी उपस्थित ‘स्टेप’ फाउंडेशनचे पदाधिकारी
माणुसकीच्या दिव्यांनी उजळली दिवाळी
नाशिक, ता. ६ : नाशिक येथील ‘स्टेप’ फाउंडेशनतर्फे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील किरमिरा (पाडवीपाडा) येथे आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ दरम्यान पार पडलेला हा संस्थेचा नववा सांस्कृतिक देवाण-घेवाण उपक्रम ठरला.
उपक्रमांतर्गत ग्रामीण व दुर्गम भागातील बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी विविध सामाजिक मदतकार्य करण्यात आले. यात १८ निराधार व्यक्तींना किराणा किट, १७० कुटुंबांना दिवाळी फराळ, १५० हून अधिक साड्या व लुगड्यांचे वाटप, १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच आरोग्य व स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात डॉ. प्रशांत मुसळे यांनी महिलांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले, तर ॲड. गोरक्ष मटाले यांनी मोफत कायदेशीर मदतीबाबत माहिती दिली. तसेच गोकुळ मेदगे यांनी शाश्वत ग्रामविकासासाठी ग्रामस्थांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. संस्थेच्या २५ स्वयंसेवकांनी गावात दोन दिवस मुक्काम करून स्थानिक संस्कृती, परंपरा आणि जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला व ग्रामस्थांशी आपुलकीचे नाते जोडले.