दुर्गंधीयुक्त पाणी थेट गोदापात्रात; यंदा पावसाळी नाले सफाईकडे दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Godavari river

दुर्गंधीयुक्त पाणी थेट गोदापात्रात; यंदा पावसाळी नाले सफाईकडे दुर्लक्ष

पंचवटी (नाशिक) : यंदा अनेक ठिकाणी पावसाळी गटारी व नाल्यांची साफसफाई झाली नाही. यामुळे पहिल्याच पावसात वाघाडी नाल्याचे दुर्गंधीयुक्त पाणी गुरुवारी (ता. २३) थेट गोदापात्रात मिसळले. त्यामुळे पावसाळापूर्व गटारींच्या कामांबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

म्हसरूळ भागातून वाहत येणारा वाघाडी हा शहरातून वाहणाऱ्या इतर नैसर्गिक नाल्यांसारखा एक नाला. महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागातर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या नाल्याची इतर नाल्यांबरोबरच स्वच्छता करण्यात येते. परंतु, या वर्षी स्वच्छता न झाल्याने पहिल्याच पावसात नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाला. त्यानंतर हे पाणी गौरी पटांगणावर थेट रस्त्यावर येऊन गोदापात्रात मिसळले. गंगाघाटावरील रोकडोबा पटांगणापासून पंचवटीत जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच गर्दी असते. मात्र, गुरुवारी नागरिकांना वाघाडीचे दुर्गंधीयुक्त पाणी ओलांडून यावे लागल्याने अनेकांनी नाक मुठीत धरून जाणे पसंत केले. रोकडोबा हनुमान मंदिरासमोरील गटारही चोकप झाल्याने दरवर्षीप्रमाणेच तेही पाणी गोदापात्रात मिसळत आहे.

हेही वाचा: निवडणूक तयारी सोडून शिंदे मागे कोण जाणार?

वाघाडीत टाकला जातोय कचरा

पंचवटीतील गणेशवाडी, सरदार चौक, वाघाडी परिसरात नियमित घंटागाड्या येतात. मात्र, असे असूनही अनेक नागरिक सकाळी थेट वाघाडीत टाकत असल्याने या नाल्यात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. विशेषतः पंचवटीच्या बाजूने हा कचरा वाघाडीत टाकला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. वाघाडीला मोठा पूर आल्यास हा कचरा थेट गोदापात्रात वाहून जाईल, त्यामुळे हा कचरा त्वरित काढावा, अशी मागणी आहे.

हेही वाचा: Video : Eknath Shinde असो वा राणे, प्रत्येक बंडात नाशिक केंद्रस्थानी!

मातीचे ढिगारे पडून

गंगाघाटावर मोठ्या प्रमाणावर भूमिगत गटारींची कामे सुरू आहेत. या ठिकाणाहून काढलेली माती गौरी पटांगणावर टाकली जाते व तेथून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी नेली जाते. म्हणजेच एका कामासाठी दोन वेळेस खर्च केला जात असल्याचे दिसून येते. ही माती ज्या ठिकाणी टाकायची तेथेच थेट नेणे गरजेचे आहे. परंतु, एकाच कामासाठी दोन वेळेस केला जाणारा खर्च नक्की कोणासाठी, असा प्रश्‍न जाणकारांकडून विचारला जातो आहे.

Web Title: Stinking Water Directly Into Godavari River In Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikrainGodavari River
go to top