शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावे फसवणूक
पती-पत्नीकडून २० लाखांचा गंडा; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आणि दोन नामांकित कंपन्यांची बनावट कागदपत्रे व दस्तावेज दाखवून २० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदर्शनगर येथील मयूर संजय वानखेडे (वय २४) यांच्या तक्रारीनुसार नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत शहरातील शिवकॉलनी परिसरात संशयितांच्या घरी हा प्रकार घडला. संशयित ललिता देवेंद्र पाटील आणि देवेंद्र लक्ष्मण पाटील (दोन्ही रा. अंतुर्ली खुर्द, ता. एरंडोल, जि. जळगाव) यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल, असे सांगितले. तसेच आपण एका नामांकित कंपनीचे अधिकृत ब्रोकर असल्याचे सांगून, सुरुवातीला थोडाफार परतावा देऊन फिर्यादीचा विश्वास संपादित केला. त्यानंतर दोन्ही कंपन्यांचे बनावट दस्तावेज दाखवून फिर्यादीला जास्त रकमेची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. या दरम्यान संशयितांनी फिर्यादीच्या बँक खात्यावर व काही रक्कम रोख स्वरूपात घेऊन एकूण २० लाख रुपयांची फसवणूक केल्यावरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक उपनिरीक्षक संजय शेलार तपास करीत आहेत.