Anganwadi Workers Strike : साडेचार हजार अंगणवाड्यांना टाळे! जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही संप कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

Anganwadi Workers Strike : साडेचार हजार अंगणवाड्यांना टाळे! जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही संप कायम

नाशिक : अंगणवाडीसेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांनी तीन दिवसापासून संप पुकारला आहे. त्यामुळे रोज शाळेचा लळा लागलेली बालके हिरमुसली आहेत. त्यांना खेळण्याच्या साहित्यासह मनमुराद बागडण्यास मिळत होते.

तसेच पूरक आहारही अंगणवाडीत मिळत होता. मात्र, आता हे सर्वच बंद असल्याने पालकांच्याही संप कधी मिटतो, याकडे नजरा लागल्या आहेत. (Anganwadi Workers Strike Stop four half thousand Anganwadis strike continued for third day in district nashik news)

अंगणवाडीसेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडीसेविका यांच्या मानधनात भरीव वाढ, मराठीतून पोषण ट्रॅकर ॲप, ग्रॅच्युइटी आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंगणवाडीसेविका मदतनीस सोमवार (ता. २०)पासून बेमुदत संपावर आहेत.

त्यामुळे सातारा जिल्ह्यातील चार हजार ५२४ अंगणवाड्यांना टाळे लागले आहे. अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत शासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने हा संप सुरू केला आहे.

राज्यभरात पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांनी संपाबाबत आंदोलने केली. संपात नाशिक जिल्ह्यातील चार हजार ७४६ अंगणवाड्या, तर ५०९ मिनी अंगणवाड्या आहेत.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

यात चार हजार ५४ अंगणवाडीसेविका, ४९० मिनी अंगणवाडीसेविका, तीन हजार ९४४ मदतनीस कार्यरत असून, संपात चार हजार ४६३ अंगणवाडीसेविका, ४८१ मिनी अंगणवाडीसेविका, तीन हजार ८९७ मदतनीस सहभागी झाल्या आहेत. तर ६१ अंगणवाडीसेविका, ९ मिनी अंगणवाडीसेविका व ४७ मदतनीस संपात सहभागी झाल्या नसून काम करत असल्याचा दावा महिला बालकल्याण विभागाने केला आहे.

जिल्ह्यातील पेठ २१८, हरसूल १९७, सुरगाणा १९६, बाऱ्हे ९८, इगतपुरी ३१५, दिंडोरी १७७, उमराळे १६२, कळवण- एक १४०, कळवण- दोन १२५, नाशिक १९३, त्र्यंबकेश्वर १५७, देवळा २०७, बागलाण- एक २४५, बागलाण- दोन २००, सिन्नर- एक १६७, सिन्नर- दोन १६७, निफाड १६०, मनमाड १५६, मनमाड ११६, येवला-एक ११५, येवला-दोन ११२, नांदगाव १२२, चांदवड-एक १७९, चादंवड-दोन ९८, मालेगाव २७३, रावळगाव १६८ अशा एकूण चार हजार ४६३ अंगणवाड्यांना टाळे लागले आहे. अंगणवाडी बंद असल्याने बालकांचा पूरक आहारही बंद असल्याने त्यांचे हाल होत आहे.