टूडे साठी
---------------
भटके श्वान निर्बिजीकरण
वेगात, पण निविदेकडे पाठ
महापालिकेवर फेरनिविदेची नामुष्की
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : भटक्या श्वानांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेने निर्बीजीकरणाला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. सहा विभागांसाठी प्रत्येकी दोन विभागांकरिता एक याप्रमाणे एकूण तीन कंत्राटे दिली जाणार असून, यासाठी ३ कोटी ९० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रत्येक कंत्राटासाठी १ कोटी ३० लाख रुपये खर्च येणार आहे. मात्र पहिल्या निविदेत प्रत्येकी केवळ एक-दोन मक्तेदार आल्याने स्पर्धात्मक दर मिळाले नाहीत. त्यामुळे प्रशासनाला फेरनिविदा काढावी लागली आहे.
निविदा सादर करण्याची शेवटची मुदत १६ नोव्हेंबर आहे. २२ वर्षांत १ लाख ३५ हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालय आणि ॲनिमल वेल्फेअर बोर्डाच्या निर्देशांनुसार २२ वर्षांपासून ही मोहीम सुरू आहे. आतापर्यंत सुमारे १ लाख ३५ हजार भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले आहे. तरीही प्रजनन वेग जास्त असल्याने संख्या आटोक्यात आलेली नाही. गतवर्षी सहा विभागांसाठी दोन कंत्राटे काढली होती, त्यातील एकालाच प्रतिसाद मिळाला होता.गेल्या ११ महिन्यात ५,२३७ शस्त्रक्रिया गतवर्षी डिसेंबरमध्ये युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअरला एक वर्षासाठी ठेका देण्यात आला. त्यावर ८० लाख रुपये खर्च झाला.डिसेंबर ते ऑक्टोबर या ११ महिन्यांत ५,२३७ कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले.
----------------
यंदाची निर्बीजीकरण आकडेवारी
डिसेंबर - ४३७
जानेवारी - ३८०
फेब्रुवारी - २३९
मार्च - ४२२
एप्रिल - ५११
मे - ४६३
जून - ५५३
जुलै - ५७९
ऑगस्ट - ५४२
सप्टेंबर - ५७४
ऑक्टोबर - ५३७.
----------------------