इंदिरानगर- इंदिरानगर-पाथर्डी भागात ठिकठिकाणी भरणारे रस्त्यावरचे भाजी बाजार आणि इतर व्यावसायिकांनी व्यापलेले रस्ते डोकेदुखी ठरत असून, वाहतुकीला मोठा अडसर ठरत आहेत..जॉगिंग ट्रॅकजवळ असलेल्या साईनाथ चौफुली भागात अधिकृत भाजी विक्रेत्यांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ग्राहक सहसा आत येत नाहीत म्हणून हे भाजीविक्रेते रस्त्यावर बसने पसंत करतात. त्यांना लागूनच इतर खाद्यपदार्थांच्या गाड्या असतात. इंदिरानगरमध्ये मार्गस्थ झाले, की श्रीजयनगरपासून पुढे रस्त्याच्या दुतर्फा भाजीविक्रेते आणि हातगाडीवर फळे विकणारे दिसू लागतात. रथचक्र चौकापर्यंतचा भाग भाजी विक्रेत्यांमुळे व्यापलेला आहे. त्यामुळे थोडासाच रस्ता वहिवाटसाठी शिल्लक राहतो..भाजी विक्रेत्यांसोबत फुलविक्रेते आणि इतर विक्रेत्यांची दुकाने येथे थाटलेली आहेत. अनेक व्यावसायिक आपले ओटे भाडेतत्त्वावर काही तासांसाठी देतात. कलानगर चौकात महापालिकेची कृष्णकांत भाजी मंडई आहे. मात्र येथील ओटे ओस पडले आहेत. माजी नगरसेवक ॲड. श्याम बडोदे यांनी त्यात सुधारणा देखील केली. मात्र आतमध्ये कुणी भाजी घेण्यासाठी येत नाही, असे येथील विक्रेते सांगतात..तसेच केंब्रिज शाळेपर्यंत हातगाडी, छोटे टेम्पो, रिक्षा यावर दुकाने थाटून व्यवसाय करणाऱ्यांची गर्दी असते. पांडवनगरी चौक, गुरुगोविंदसिंग महाविद्यालय परिसर येथेदेखील चारचाकी गाड्या, तसेच रस्त्यावरच दुकाने मांडून भाजी आणि फळविक्रेते व्यवसाय करतात. सायंकाळी नागरिक फिरण्यास निघतात. त्या वेळी या भागात गर्दी होते. अनेक वेळा अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. मात्र पथक माघारी गेले, की पुन्हा विक्रेते येतात..रस्त्यावरच्या या बाजारांची समस्या राजीवनगर भागातील राणेनगर बोगद्याजवळ देखील आता सुरू झाली आहे. दीपालीनगर रस्त्यावर देखील अनधिकृत भाजी बाजार आहे. वासननगर येथील गामणे मैदानावरील भाजी मार्केट आता मैदानाच्या दोन्ही बाजूंनी व्यापलेला आहे. पाणिनी सोसायटीच्या समोरच्या रस्त्यावर आणि आव्हाड पेट्रोलपंपाच्या चौकात दोन्ही बाजूला भाजी विक्रेते बसल्याने वाहतूक समस्या निर्माण होत आहे. मुरलीधरनगरमध्ये भाजी बाजार आहे. मात्र मूळ शेतकऱ्यांना सोडून इतरांनी येथील ओट्यांवर कब्जा करून हे ओटे भाड्याने दिल्याचे शेतकरी सांगतात. येथील बाजार देवळाली-पाथर्डी रस्त्यापर्यंत आहे..सध्या मोबाईल अतिक्रमण ही संकल्पना व्यावसायिकांनी आत्मसात केली आहे. छोट्या चारचाकी आणि तीनचाकी वाहनांवर दुकाने थाटण्यात येतात. यात इतर दुकानांसोबत अगदी चिकन, मटणची दुकाने देखील आढळून येतात. सकाळ-सायंकाळ तीन तास गर्दीच्या ठिकाणी वाहन लावायचे, व्यवसाय करायचा आणि निघून जायचे, अशी ही पद्धत आहे. मात्र त्यामुळे रस्त्यावर वाहनांची कोंडी होते. अतिक्रमण विभाग कारवाईसाठी आले, की वाहने चालू करायचे आणि तिथून निघून जायचे. त्यामुळे कारवाईचा प्रश्न येत नाही..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.