फोटो : H34943
-------------------
बालेकिल्ला भक्कम करण्यासाठी सज्ज व्हा
मिर्लेकर यांचा शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांशी संवाद
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १३ : नाशिक जिल्हा शिवसेनेचा (उबाठा) बालेकिल्ला आहे. येथे पक्षाला मोठा जनाधार आणि शिवसैनिकांचे भक्कम संघटन आहे. ही ताकद आणखी वाढविण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि शिवसैनिकाने जोमाने कामाला लागावे, असे आवाहन पक्षाचे संपर्क उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी केले.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या वेळी मिर्लेकर यांनी जिल्ह्यातील संघटनेचा सविस्तर आढावा घेतला. आगामी राजकीय वाटचाल, संघटनात्मक बांधणी आणि पक्षविस्तार याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शिवसेना हा केवळ राजकीय पक्ष नसून, सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी चळवळ आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने पदाची जबाबदारी ओळखून जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. शेतकरी, कामगार, तरुण, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेऊन पक्षाच्या माध्यमातून प्रभावीपणे आवाज उठवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बैठकीत संघटनेची सद्यस्थिती, आगामी रणनीती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पूर्वतयारी आणि पक्षवाढीच्या उपक्रमांवर चर्चा झाली.या बैठकीला उपनेते दत्ता गायकवाड, सहसंपर्कप्रमुख सुरेश राणे, लोकसभाप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा सचिव निलेश साळुंखे, महानगर संघटक संजय परदेशी, विधानसभा संपर्कप्रमुख सतीश कदम आणि जिल्हा संघटक ऋषी वर्मा यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
-------------चौकट
स्थानिक प्रश्नांवर लढा द्या
पक्षाची खरी ताकद बूथस्तरावरील शिवसैनिकांत आहे. त्यामुळे प्रत्येक गाव, शहर, प्रभाग आणि बूथवर सक्षम संघटन उभे करून नवीन कार्यकर्त्यांना जोडावे आणि जुन्या शिवसैनिकांचा सन्मान राखत सर्वांना सोबत घेऊन कामाला गती द्यावी, असे निर्देश मिर्लेकर यांनी दिले. शेतकरी, महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, रस्ते, पाणी यासारख्या स्थानिक प्रश्नांवर शिवसेनेने वर्षभर जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे ते म्हणाले. युवा आणि महिला संघटनांना बळ देऊन नव्या पिढीला संधी द्यावी आणि प्रत्येक मतदारसंघात काम गतिमान करावे, असे आवाहन करत समन्वय, एकजूट आणि सक्रियता ठेवल्यास पक्ष अधिक ताकदवान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
-----------------------