विद्यार्थ्यांचे टंकलेखन परीक्षेचे शुल्क माफ करावे
जिल्हा टाइपरायटिंग इन्स्टिट्यूट असोसिएशनची परीक्षा परिषदेकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता. २९ : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभ दिला जात असताना, शासकीय संगणक टंकलेखन (जीसीसी-टीबीसी) आणि लघुलेखन (स्टेनो) परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ही सवलत लागू करावी, अशी मागणी नाशिक जिल्हा टाइपरायटिंग इन्स्टिट्यूट असोसिएशनने राज्य परीक्षा परिषदेकडे निवेदनाद्वारे केली.
शासनाने मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा, त्र्यंबकेश्वर, चांदवड आणि निफाड तालुक्यांसह राज्यातील ३०५ दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश केला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यात शासनाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर डिसेंबरमध्ये होणाऱ्या शासकीय संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षेस प्रविष्ट तसेच दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना टंकलेखन आणि लघुलेखन परीक्षेच्या शुल्कातूनही सवलत मिळावी, अशी संघटनेची भूमिका आहे. त्यासाठी टंकलेखन व लघुलेखन परीक्षार्थींनाही शुल्कमाफी द्यावी, यापूर्वी परीक्षा शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क परत करावे, पुनर्परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या सवलतीचा लाभ मिळावा, असे संघटनेने म्हटले आहे.
दुष्काळामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती अडचणीची असून, परिषदेने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी असोसिएशनने केली आहे. हे निवेदन परीक्षा परिषदेचे अध्यक्ष, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करण्यात आले. निवेदनावर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष नितीश डावरे, जिल्हा प्रतिनिधी सुरेश देवरे, उपाध्यक्ष सुहास भार्गवे, सचिव सचिन सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.