27383
दुर्गाभवानीवाडी : येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून मजुरांना दिवाळी फराळ वाटप करताना.
खाऊच्या पैशांतून मजुरांना दिवाळी फराळ
दुर्गाभवानीवाडी शाळेचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांनी जपली माणुसकी
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. ३ : स्वतःच्या आनंदासाठी खर्च होणाऱ्या खाऊच्या पैशांची बचत करून दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाची फुले फुलविण्याचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजले, तर शिक्षणाचे खरे सार्थक होते. याच मूल्यशिक्षणाचा प्रत्यय जिल्हा परिषद शाळा दुर्गाभवानीवाडी (ता.येवला) येथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आणून दिला.
दुष्काळी परिस्थितीत कष्ट करणाऱ्या परप्रांतीय महिला मजुरांना दिवाळी फराळाचे वाटप करून विद्यार्थ्यांनी केवळ दिवाळीचा आनंद वाटला नाही, तर सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा अनोखा आदर्शही समाजासमोर ठेवला. दिवाळी म्हटली की फराळ, फटाके, नवीन कपडे आणि आनंदाची उधळण डोळ्यांसमोर येते. मात्र, आपल्या आनंदासोबत गरजूंच्या चेहऱ्यावरही हास्य फुलावे, या भावनेतून शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला.
विशेष म्हणजे, यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या खाऊसाठी मिळणाऱ्या पैशांतून बचत करून सामाजिक कार्यासाठी हातभार लावला. बालवयातच सामाजिक जाणीव आणि सेवाभाव जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमावेळी अंदरसूल केंद्राचे केंद्रप्रमुख सोमनाथ पोतदार, शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला कोल्हे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मकरंद सोनवणे, अलकाबाई वाघचौरे, कांताबाई सोनवणे आणि उपक्रमशील शिक्षक विलास बांगर आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रप्रमुख सोमनाथ पोतदार यांनी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, संवेदनशीलता, सहकार्य आणि सेवाभाव यांसारखी जीवनमूल्ये रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच फटाके न फोडता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी गटशिक्षणाधिकारी प्रवीण बांगर, शिक्षण विस्तार अधिकारी संजय कुसाळकर यांनी शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले.