यंदा उन्हाळी सोयाबीनचे क्षेत्र राहणार कमी राहणार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : खानदेशात रब्बी किंवा उन्हाळ सोयाबीनची पेरणी यंदा कमी होणार आहे. पेरणी ११०० ते १२०० हेक्टरवर होवू शकते. पाऊस कमी राहिल्याने यंदा रब्बी किंवा उन्हाळ सोयाबीन पेरा कमी होवू शकतो. धुळे व नंदुरबारात रब्बी सोयाबीनची पेरणी फारशी केली जात नाही. या भागात कृत्रीम जलसाठाधारक सोयाबीनऐवजी भुईमुगास पसंती देतात. त्यात पाऊसमान कमी राहिल्याने जलसाठे मुबलक राहतील की नाही, अशी शंका आहे. पण, प्रतिकूल स्थितीतही अनेक शेतकरी सोयाबीनचे चांगले उत्पादन रब्बीत घेत आहेत. पाऊसमान कमी झाल्याने यंदा स्थिती बिकट राहील. नंदुरबार, धुळ्यातील पेरणी कमी राहील, असेही संकेत आहेत. सोयाबीनचे उत्पादन यंदा खरिपात कमी आले आहे. बऱ्यापैकी दर सध्या सोयाबीनला आहे. नंतरही दर टिकून राहतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. पेरणीच्या वेळेसही दर ४६०० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. यामुळे सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली. परंतु कमी पावसाने उत्पादन कमी आले. सोयाबीनसह अन्य पिकांची पेरणीदेखील करावी लागेल. त्यात चारा पिकांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. यामुळे सोयाबीनची पेरणी कमी होईल, अशी स्थिती आहे.
शाश्वत जलस्रोतांच्या क्षेत्रातच पेरा शक्य
जळगाव जिल्ह्यात उन्हाळ सोयाबीनची पेरणी नोव्हेंबर महिन्यातच सुरू होते. त्यात कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना पसंती देण्यात येते. पाण्याची अडचण असल्याने पेरणी वाढणार नाही. ज्या भागात शाश्वत जलस्रोत आहेत, त्या भागात इतर पिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी तुषार सिंचन, ठिबकच्या माध्यमातून सोयाबीनचे सिंचन करण्याचे नियोजन केले आहे.