लखमापूर (दिंडोरी): माझ्या पांडुरंगाला जर मी मटण खाल्लेलं चालतं, तर तुम्हाला काय अडचणी आहे? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी (ता. २३) खेडगाव येथे केला. ‘आम्ही आमच्या पैशाने मटण खातो, आम्ही कुणाचे मिंधे नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही त्यांनी टीका केली. पत्ते तुम्ही खेळायचे आणि कोर्टात चकरा आम्ही मारायच्या का? अशा शब्दांत सुनावत तुमची अब्रू तुमच्याच माणसाने घालविली. तुमचा व्हिडिओ कोणी काढला? अशा शब्दांत त्यांनी जोरदार टीका केली.