सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात प्रथमच शस्त्रक्रिया प्रसुती

सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात प्रथमच शस्त्रक्रिया  प्रसुती
Published on: 
पान दोन मेन ------------------------- 03151 सुरगाणा : वैद्यकीय अधिकारी यांचा सत्कार करताना नगरसेवक भगवान आहेर. सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात प्रथमच सिझेरियन प्रसूती यशस्वी मातांसाठी दिलासादायक पाऊल; पाच दशकानंतर आरोग्य सेवाबळकटीच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल सकाळ वृत्तसेवा सुरगाणा, ता. २८ : आदिवासीबहुल आणि डोंगराळ सुरगाणा तालुक्याच्या आरोग्यसेवेच्या दृष्टीने एक ऐतिहासिक आणि अत्यंत दिलासादायक घटना घडली आहे. सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात स्थापनेपासून प्रथमच सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे एका महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात आली असून, माता व नवजात बालक दोघेही सुखरूप आहेत. दुर्गम भागातील आरोग्यसेवेच्या दृष्टीने याला एक महत्त्वपूर्ण उपलब्धी मानले जात आहे. सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात आजवर सर्वसाधारण (नॉर्मल) प्रसूतीच केल्या जात असत. काही गुंतागुंतीची किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता भासल्यास रुग्णांना ९० किलोमीटरहून अधिक अंतराच्या नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवावे लागत असे. रस्ते चांगले नसल्याने या प्रवासात अनेकदा काही मातांची अर्ध्या रस्त्यातच प्रसूती झाल्याच्या घटनाही घडल्या होत्या. साधारण ४५ ते ५० वर्षांपूर्वी तत्कालीन आरोग्यमंत्री गाडेकर आणि दिवंगत खासदार हरिभाऊ महाले यांच्या हस्ते या ग्रामीण रुग्णालयाचे उद्‌घाटन झाले होते. तेव्हापासून आजपर्यंत या रुग्णालयाला कायमस्वरूपी स्त्रीरोगतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञ मिळालेला नव्हता. मात्र, या सर्व अडचणींवर मात करत सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात प्रथमच सिझेरियन प्रसूती यशस्वी झाल्याने शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा पार पडला आहे. आदिवासी भागातील आरोग्यसेवेला नवी दिशा सुरगाणा तालुका दुर्गम व आदिवासीबहुल असल्याने येथील अनेक गावे आणि पाडे मुख्य रस्त्यांपासून दूर आहेत. यामुळे नागरिकांना वेळेवर आरोग्यसेवा मिळताना अनेक अडचणी येतात. विशेषतः गर्भवती महिलांना प्रसूतीच्या वेळी तातडीच्या उपचारांची गरज असते. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवरच सिझेरियन प्रसूती यशस्वी होणे ही स्थानिक आरोग्य व्यवस्थेसाठी आशादायक बाब ठरली आहे. या सुविधेमुळे भविष्यात आपत्कालीन परिस्थितीत इतरत्र जाण्यासाठी लागणारा वेळ वाचणार असून स्थानिक पातळीवरच उपचार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. वैद्यकीय पथकाचे अभिनंदन यशस्वी प्रसूतीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयाचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली, भूलतज्ज्ञ डॉ. संजय चौधरी यांनी भूलविषयक सर्वस्व जबाबदारी सांभाळली. तसेच अधिपरिचारिका कविता पोरजे, प्रमोद कवर व परिचारिका रोहिणी व इतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या यशस्वी कामगिरीबद्दल नगरसेवक भगवान आहेर, रामभाऊ थोरात, रतन चौधरी यांच्यासह विविध स्तरांमधून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज गेल्या चार-पाच दशकांहून अधिक काळ लोटला तरी घडलेली ही घटना आरोग्यसेवेत एक आशेचा किरण ठरली आहे. मात्र, यावरून ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. तालुक्यात कायमस्वरूपी स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ तसेच बालरोगतज्ज्ञ, आवश्यक उपकरणे आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची उपलब्धता लवकरात लवकर करून देणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com