NSK26H31711 आमदार सुरेश भोळे
------
क्रीडा संकुलासाठी जळगावच्या हिश्श्याचे पाणी नको
उपशीर्षक
आमदार भोळेंची मागणी; पर्यायी जलस्रोतांचा विचार करण्यासंबंधी निवेदन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ८ : शहराची वाढती लोकसंख्या, प्रस्तावित हद्दवाढ तसेच भविष्यातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेता शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या उपलब्ध साठ्यावर कोणताही अतिरिक्त भार पडू नये, यासाठी शहरात नव्याने तयार होत असलेल्या क्रीडा संकुलासाठी स्वतंत्र जलस्रोत अथवा स्वतंत्र पाणीपुरवठा व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी शासनाकडे केली आहे.
यासंदर्भात आमदार राजूमामा भोळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री, जिल्हाधिकारी तसेच जळगाव शहर महापालिका आयुक्त यांना स्वतंत्र पत्र देऊन आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
१४-१
भविष्यातील हद्दवाढीसाठी..
जळगाव शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत असून शहराच्या वाढीव भागांमध्येही पाणीपुरवठ्याची गरज मोठ्या प्रमाणात आहे. सध्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतूनच शहरातील नागरिकांची गरज पूर्ण करताना अनेक आव्हाने आहेत. त्यात भविष्यात शहराची हद्दवाढ झाल्यास नव्याने समाविष्ट होणाऱ्या भागांची पाण्याची गरजही वाढणार आहे. त्यामुळे आजच्या गरजेबरोबरच पुढील अनेक वर्षांच्या पाणीगरजेचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे आमदार भोळे यांनी म्हटले आहे.
चौकट
पर्यायी जलस्रोतांचा विचार गरजेचा
संबंधित प्रकल्पासाठी उपलब्ध पर्यायी जलस्रोतांचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून व्यवहार्य पर्याय निश्चित करावा. प्रकल्पाची पाण्याची गरज स्वतंत्रपणे भागविण्यासाठी आवश्यक नियोजन व पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. जळगाव शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबत प्रस्तावित हद्दवाढ, नवीन निवासी भाग, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये, उद्योग व इतर नागरी सुविधांची भविष्यातील पाणीगरज लक्षात घेऊन दीर्घकालीन जलनियोजन आराखडा तयार करण्याची आवश्यकता असल्याचेही आमदार भोळे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
-------