
साल्हेर : बागलाण तालुक्यातील साल्हेर-वाघंबा शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील दहावीच्या विद्यार्थ्याचा चिकार डोंगरावरून पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. १०) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. रोशन दगडू शिंदे (वय १५) असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, रोशन वडिलांशी बोलूनच शाळेतून निघून गेल्याचा दावा मुख्याध्यापकांनी केला आहे.
वाघंबा शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत दहावीत शिक्षण घेत असलेला रोशन शिंदे मंगळवार (ता. ६) पासून शाळेतून बेपत्ता होता. याच शाळेत रोशनची लहान बहीण खुशाली, भाऊ धनराज शिक्षण घेतात. मात्र, ते आठ दिवसांपूर्वी आपल्या गावी साल्हेर-तुपविहीरपाडा येथे गेले होते. बरेच दिवस झाल्यामुळे वडील दगडू शिंदे हे खुशाली व धनराज यांना घेऊन मंगळवारी (ता. ८) वाघंबा शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत सोडण्यासाठी गेले. त्या वेळी त्यांनी शिक्षकांकडे मुलगा रोशनची चौकशी केली; परंतु रोशन शाळेत नसल्याची माहिती शिक्षकांनी दिल्यानंतर दगडू शिंदे यांनी नातेवाइकांकडे शोधाशोध केली. मात्र, कुठेच शोध लागला नाही.
साल्हेर किल्ला, टक्कार डोंगर आदी परिसरात शोध घेतला. शेवटी मगरबारा, चिकार कड्याखाली बघायला सुरवात केल्यानंतर झाडाझुडपांमध्ये रोशनचा मृतदेह आढळून आला. याबाबत जायखेडा पोलिसांना कळविण्यात आले. मात्र, घटनास्थळ गुजरातच्या सीमेवर असल्याने आहवा-डांग पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. रात्री उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्यात आला. विच्छेदनासाठी मृतदेह आहवा-डांग शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.
जायखेड्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, पोलिस हवालदार राजेंद्र वाघ, टी. एस. जगताप, आर. ई. भामरे, पी. पी. भारंबाळ तपास करीत आहेत.
रोशन बेपत्ता झाल्यावरही आम्हाला शिक्षकांनी कुठलीच कल्पना दिली नाही. ज्या दिवशी शाळेतून तो गेला त्या दिवशी शाळेची चौकशी केली असती तर आज हा प्रसंग आला नसता. या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
-दिलीप शिंदे, माजी सरपंच, तुपविहीरपाडा
रोशनचे मंगळवारी आपल्या वडिलांशी मोबाइलवरून बोलणे झाले होते. त्यानंतर तो शाळेतून निघून गेला.
- दिगंबर देवरे, मुख्याध्यापक
रोशनचा चिकार कड्यावरून पडून मृत्यू झाल्याने या प्रकरणात शाळेतील दोषींवर कारवाई करण्यात येईल. मृत विद्यार्थी रोशनला न्याय मिळवून देऊ.
-दिलीप बोरसे, आमदार, बागलाण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.