फोटो : 34588
नंदुरबार : सहाय्यक प्रकल्प अधिकारी भानुदास वसावे यांना निवेदन देताना पंडित माळी, डॉ. हेमंत शर्मा, रमेश पाटील, दिनेश सोनवणे, मन्नान गणी शिकलीकर, इम्तियाज पटेल, अक्षय श्रीखंडे, बापू महाजन, भरत गुरव, गोपाल राजपूत.
------------------------
विद्यार्थिनी मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई करावी
शिवसेनेचे (उबाठा) प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन
नंदुरबार, ता. ५ : शहरातील चौपाळे रोडवर असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या शासकीय मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी वसतिगृह अधीक्षिका, कर्मचारी तसेच प्रकल्प प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) जिल्हाप्रमुख पंडित माळी यांनी केली.
निवेदनाचा आशय असा ः दोन वर्षांपासून संबंधित विद्यार्थिनी शासकीय मुलींच्या वसतिगृहात वास्तव्यास होती. घटनेच्या आदल्या दिवशी तिचे आई-वडिलांशी फोनवरून संभाषण झाले होते. प्रकृती ठीक नसल्यामुळे ती गावी जाणार होती. मात्र, त्यानंतर तिचा वसतिगृहातच संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी एका तरुणाने तिचा भाऊ असल्याचे सांगून वसतिगृहात प्रवेश मिळवल्याची बाब समोर आली आहे. संबंधित तरुणाची योग्य शहानिशा न करता त्याला वसतिगृहात प्रवेश कसा मिळाला? अभ्यागतांची नोंद का तपासली नाही? वसतिगृहाचे अधीक्षक आणि कर्मचारी काय करत होते? असा सवाल पंडित माळी यांनी उपस्थित केला आहे.
या घटनेत वसतिगृह प्रशासनाची निष्काळजी दिसून येते. वसतिगृहांत वारंवार अशा घटना घडत असताना प्रशासनाला जाग का येत नाही? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी. शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक तपासणी, सीसीटीव्ही फुटेज आणि वसतिगृहातील अभ्यागत नोंदवही तपासावी. संबंधित वसतिगृह अधीक्षिका व कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करावे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. दोषींना वाचविण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा माळी यांनी दिला आहे. या वेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी भानुदास वसावे यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाप्रमुख पंडित माळी, उपजिल्हाप्रमुख डॉ. हेमंत शर्मा, तालुकाप्रमुख रमेश पाटील, जिल्हा सचिव दिनेश सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष मन्नान गणी शिकलीकर, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष इम्तियाज पटेल, युवा मोर्चाचे जिल्हा सचिव अक्षय श्रीखंडे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बापू महाजन, तालुका संघटक भरत गुरव, उपतालुकाप्रमुख गोपाल राजपूत, अल्पसंख्याक शहराध्यक्ष अशपाक शहा इशाक शहा, आरोग्य विभाग जिल्हाध्यक्ष डॉ. नीलेश शर्मा आदी उपस्थित होते.