फोटो क्रमांक ः 34853
धुळे ः स्वामिनारायण मंदिरात सोमवारी प्रज्वलित तीन हजार दिव्यांसह सुरत अक्षरधाम मंदिराची आकर्षक रांगोळी.
--
धुळ्यात तीन हजार दिव्यांची महाआरती
-
स्वामिनारायण मंदिरत आनंदजीवन स्वामींच्या हस्ते सोहळा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ९ ः येथील बीएपीएस स्वामिनारायण मंदिरात सोमवारी (ता. ९) दीपोत्सव आणि महाआरती सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात तब्बल तीन हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. तेजोमय प्रकाशाने संपूर्ण मंदिर परिसर न्हाऊन निघाला.
दीपोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे बालिका व युवती मंडळातर्फे परिश्रमाने साकारलेली ‘सुरत अक्षरधाम’ मंदिराची हुबेहूब रांगोळी. या आकर्षक रांगोळीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. महाआरती संत आनंदजीवन स्वामी यांच्या हस्ते झाली. अक्षर पुरुषोत्तम महाराज आणि गुणातीत गुरुपरंपरेची भावपूर्ण आरती करण्यात आली.
संत आनंदजीवन स्वामी यांनी उपस्थितांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या. वर्षानुवर्षे जपली जाणारी ही दीपोत्सव परंपरा केवल बाह्य प्रकाशाचा नव्हे, तर अंतर्मन प्रकाशित करून आंतरिक प्रगती साधण्याचा संदेश देते, असे संत आनंदजीवन स्वामी यांनी स्पष्ट केले. नेत्रदीपक सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.