जरीफबाबा खून प्रकरणात ट्विस्ट : देणग्यांसाठी बॉलिवूड अभिनेत्यांच्या नावाचा वापर | Latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Zarif Chisti Baba

जरीफबाबा खून प्रकरणात ट्विस्ट : देणग्यांसाठी बॉलिवूड अभिनेत्यांच्या नावाचा वापर

नाशिक : निर्वासित अफगाणी सुफी धर्मगुरू जरीफबाबांच्या खून प्रकरणाच्या चौकशीतून काही गंभीर बाबी उघड होत आहेत. जरीफबाबाचे सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येने फॉलोअर्स होते. या फॉलोअर्सकडून मोठ्या प्रमाणात देणग्या मिळत. मात्र यासाठी बाबाने अनोखी शक्कल लढविली असून, अभिनेता शाहरूख खान, सलमान खान यांच्या नावांचा वापर करून एडीट केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून कोट्यवधींचे फडिंग (देणग्या) मिळविल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दरम्यान, गेल्याच वर्षी जरीफ बाबांसंदर्भातील गोपनीय माहिती पोलिसांनी आयबीला (इंटेलिजन्स ब्यूरो) दिली आहे. (Latest marathi news)

मंगळवारी (ता.५) रात्री निर्वासित अफगाणी सुफी धर्मगुरू ख्वाँजा सय्यद जरीफ अहमद चिश्ती ऊर्फ जरीफबाबा (वय ३३) यांची डोक्यात गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. पसार झालेल्या संशयितांना शोधासाठी ग्रामीण पोलिसांची विविध पथके परराज्यात रवाना झाली आहेत.

हेही वाचा: सय्यद जरीफ चिस्ती हत्या प्रकरण : चिस्ती बाबाचे वावी कनेक्शन

दरम्यान, धर्मगुरू जरीफबाबा खूनप्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. जरीफबाबा यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात देणग्या येत. याच देणग्यांतून त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या नावावर कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केली. याच अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता, सोशल मीडियावरून जरीफबाबाने व्हिडिओ प्रसारित केले आहेत. या व्हिडिओंमध्ये अभिनेता शाहरूख खान, सलमान खान, अमीर खान यांच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. या व्हिडिओंमध्ये खुबीने एडिटिंग करून ते व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले जात. यातून या अभिनेत्यांना बाबांचा आशीर्वाद असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला जात होता. या माध्यमातून बाबाने देणग्या घेतल्याचे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयिताच्या चौकशीतून समोर येत आहे. त्यादिशेने पोलिस पुढील तपास करीत आहेत.

‘आयबी’ला अहवाल
नाशिक ग्रामीण पोलिसांनी २०२१ मध्ये जरीफबाबा यांच्यासंदर्भातील गोपनीय माहिती संकलित केली होती. यात त्यांच्या पत्नी व चालकाची चौकशी करून तो अहवाल २२ एप्रिल २०२१ ला आयबीला (इंटेलिजन्स ब्यूरो) देण्यात आला आहे. त्यांना मिळत असलेल्या देणग्यांवरून ते राष्ट्रीय गोपनीय तपास यंत्रणांच्या रडारवरही होते.

हेही वाचा: जन्मदात्रीनेच घोटला मनोरुग्ण मुलाचा गळा; ढेकू येथील घटना

बाबचे लाखो फॉलोअर्स
जरीफबाबा सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफार्मवर ॲक्टिव्ह होते. त्यामुळे त्यांचा लाखोच्या संख्येने चाहता वर्ग निर्माण झाला होता. यू-ट्यूब चॅनलवर त्यांचे सात लाख ३३ हजार, फेसबुकवर पाच लाख, तर इन्स्ट्राग्रामवर सुमारे १७ हजार फॉलोअर्स आहेत. याच माध्यमातून ते देणग्यांसाठी आवाहन करीत असत. यातूनच त्यांनी कोट्यवधींच्या देणग्या मिळविल्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: Syed Zarif Chishti Baba Murder Case Actors Name Involved For Donation Latest Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikCrime Newsdeath