काळखेड्याचा तलाठी
लाच घेताना जाळ्यात
सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी एक हजाराची मागितली लाच
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १८ : शेतीच्या सातबारा उताऱ्यावर मुलाचे नाव लावण्यासाठी एक हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या काळखेडे (ता. धुळे) येथील ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) विक्रमसिंग भगवानसिंग गोठवाल याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुद्देमालासह ताब्यात घेतले. तक्रारदाराने काळखेडे येथील शेतजमीन त्यांच्या मुलाच्या नावे खरेदी केली होती. खरेदीखतावरून सातबारा उताऱ्यावर मुलाचे नाव लावण्यासाठी त्यांनी सोमवारी (ता. १६) तलाठी गोठवाल यांची भेट घेऊन सूची क्रमांक दोन जोडून अर्ज दिला. मात्र, ही नोंद करण्यासाठी गोठवाल याने एक हजार रुपयाची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी पंचांसमक्ष तक्रारीची पडताळणी केली असता, गोठवाल याने लाच मागून ती स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार बुधवारी (ता. १८) सापळा रचून संशयिताने तक्रारदाराकडून एक हजार रुपयाची लाच स्वतः स्वीकारली. त्याला मुद्देमालासह पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक प्रदीप मैराळे व कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक सचिन साळुंखे, निरीक्षक पद्मावती कलाल, राजन कदम, मुकेश अहिरे, रामदास बारेला, प्रशांत बागूल, जगदीश बडगुजर यांनी केली.