हजार रुपयांची लाच
घेताना तलाठ्यास पकडले
---
आमोदा येथे जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
जळगाव/यावल, ता. ६ : शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यावर कूपनलिकेची (बोरवेल) नोंद करून उतारा देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना आमोदा (ता. यावल) येथील तलाठी शैलेश अंकुश झोटे (वय ३८ ) यांना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुद्देमालासह पकडले.
३६ वर्षीय तक्रारदार शेतकऱ्याने शेतात सिंचनासाठी कूपनलिका केली होती. शासकीय योजनेंतर्गत सोलर सिस्टीम बसवण्यासाठी सात बारा उताऱ्यावर कूपनलिकेची नोंद असणे आवश्यक होते. या कामासाठी तक्रारदार तलाठी शैलेश झोटे यांच्याकडे गेले असता, त्यांनी चार हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी शेतकऱ्याने साडेतीन हजार रुपये दिले होते. त्यानंतर उर्वरित ५०० रुपये आणि उताऱ्याची प्रत देण्यासाठी अतिरिक्त ५०० रुपये, अशी एकूण एक हजार रुपयांची लाच तलाठी झोटे याने २ ऑक्टोबरला पुन्हा मागितली. तक्रारदाराने याबाबत मंगळवारी (ता. ६) जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक स्मिता नवघरे, सुनील वानखेडे, प्रणेश ठाकूर आणि मनोज पाटील यांनी मंगळवारी आमोदा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सापळा रचला. तलाठी शैलेश झोटे याने तक्रारदाराकडून हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्याला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. याबाबत फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.