Nashik News: उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे कळवणला आगमन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

statue of Chhatrapati Shivaji Maharaj to be installed on Shivtirtha arrived in the taluka, residents of Kalavan participated in the procession taken out on the occasion.

Nashik News: उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे कळवणला आगमन

कळवण (जि. नाशिक) : येथील शिवतीर्थवर बसवण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच (२१ फूट) अश्वारूढ पुतळ्याचे दिल्लीहून कळवणला बुधवारी (ता.१) सायंकाळी पाचला आगमन झाले. तालुक्याच्या वेशीवर असलेल्या निवाणे येथून अश्वारूढ पुतळ्याची मिरवणुक शिवप्रेमींनी काढली.

यावेळी जय भवानी जय शिवराय या घोषणेने परिसर दणाणून गेला होता. यावेळी निवाणे शिवपासून थेट शिवतीर्थपर्यंत रांगोळी व फुलांनी भगवे झेंडे संपूर्ण कळवण शहरसह निवाणे, भेंडी फाटा, बेज फाटा, शिवफाटा भगवेमय झाले. (Tallest statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Northern Maharashtra arrived in Kalvan Nashik News)

शिवस्मारक समितीच्या वतीने छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांनी पुतळ्यास हार अर्पण करीत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार स्वागत करण्यात आले.

प्रारंभी २१ जोडप्याच्यावतीने पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात येऊन क्रेनच्या साहाय्याने पुतळा ट्रेलर ठेवण्यात आला. नगराध्यक्ष कौतिक पगार, ऋषिकेश पवार यांनी पूजन केल्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला.

यावेळी पुतळा पाहण्यासाठी शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. तालुक्याच्या वेशीपासून शिवस्मारक रस्त्याच्या दुतर्फा महिलांनी सडारांगोळी केली होती. शिवप्रेमींनी ठिकठिकाणी भगवे ध्वज लावून वातावरण भगवेमय केले होते.

निवाणे ग्रामपंचायत कार्यालय चौकात पुतळ्याची महाआरती करण्यात आली. ठिकठिकाणी आतषबाजीने स्वागत करण्यात येत आहे.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

मिरवणुकीत सहभागी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार सह पदाधिकारी, सदस्य, कळवण नगरपंचायतच नगरसेवक, तालुक्यातील विविध पक्षांचे व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी सहभागी झाले होते. निवाणे गावापासून कळवण शहरातील शिवतीर्थाकडे मार्गस्थ झाली.

असा आहे महाराजांचा पुतळा

पद्मभूषण राम सुतार या मराठमोळे शिल्पकार यांनी कळवणच्या अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच पुतळ्याला आकार दिला आहे. शिवरायांच्या पुतळ्याची उंची २१ फूट असून लांबी १७ फूट आहे. ब्राँझ धातूच्या पुतळ्याचे वजन ७ टन असून चबुतऱ्याची उंची १८ फूट तर लांबी २५ व रुंदी १५ फूट आहे.

"गेल्या अनेक वर्षांपासून कळवण तालुक्यातील शिवप्रेमींची आणि नागरिकांची असलेली इच्छा १० मार्च २०२३ रोजी पूर्ण होणार असून उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिवरायांच्या पुतळ्याचे दिल्लीहून शिवतीर्थावर आगमन झाले आहे."- भूषण पगार, अध्यक्ष, छत्रपती स्मारक समिती.