
Nashik News : निफाडला तमिळनाडूचा साबुदाणा दाखल; महाशिवरात्रीसाठी तालुकाभरात ग्राहकांची खरेदीसाठी पसंती
निफाड (जि. नाशिक) : महाशिवरात्रीसाठी निफाडच्या बाजारपेठेत तमिळनाडू राज्यातून मोठ्या प्रमाणात साबुदाणा विक्रीसाठी येत आहे. या कालावधीत ग्राहकांना होलसेल भावाने साबुदाणा कट्टा मिळत असल्याने येथे जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातील ग्राहक साबुदाणा खरेदीसाठी येत असतात.
मात्र यावर्षी साबुदाणा बाजारभावात वाढ झाली असतानाही खरेदीसाठी पाहिजे तशी ग्राहकांची पसंती लाभत नसल्याची खंत व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. (Tamil Nadu sago imported to Niphad Consumer preference for shopping for Mahashivratri across taluka Nashik News)
तालुक्यात नांदूरमध्यमेश्वर, कोठुरे, निफाड, काथरगाव, चांदोरी येथे महाशिवरात्रीची मोठी यात्रा भरते. तर या दिवशी प्रत्येक घरात उपवास केला जातो. साहजिकच या काळात साबुदाणा खरेदीला मागणी वाढते.
गेल्या काही वर्षापासून निफाडच्या बाजारपेठेत मणिचंद, वरलक्ष्मी, श्रीलक्ष्मी, डबल डॉल्फिन, सिंगल डॉल्फिन, डबल हत्ती, स्वस्तिक आदी कंपन्यांचा साबुदाणा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आला होता.
तर मागील वर्षी हाच साबुदाणा ३० किलो पॅकींगचा कट्टा १३०० ते १३५० रुपये नगाप्रमाणे विक्री झाला होता. यंदा डबल डॉल्फिन, तर लक्ष्मी ब्रम्हा १८०० ते १८५० रुपये प्रति कट्टा प्रमाणे विक्री होत आहे.
साहजिकच साबुदाणा भावात प्रती कट्ट्यामागे चारशे रुपयांची वाढ झाली आहे. विशेषत: ग्रामीण भागात या कालावधीपासून महिला वर्ग साबुदाण्यापासून उपवासाचे वेफर, चकली, कुरडई, चिवडा, पापडी आदी पदार्थ बनविण्याला प्राधान्य देतात. साहजिकच या कालावधीत साबुदाणा खरेदीसाठी मागणी वाढते.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
ग्रामीण भागातील व्यावसायिकांची गर्दी
महाशिवरात्र एका दिवसावर येऊन ठेपल्याने निफाडच्या व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात साबुदाणा विक्रीसाठी ठेवला आहे. त्यामुळे पुढील आठ दिवस निफाडच्या बाजारपेठेत साबुदाण्याचे कट्टे मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतील.
दोन दिवसांपासून निफाडच्या शिवाजी चौक, शनिचौक, बसस्थानक परिसर, मार्केट कमिटी शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, उगाव रोड या परिसरात तसेच, तालुक्यातील बाजारपेठांच्या गावांमध्ये खास करून विंचूर, लासलगाव, पिंपळगाव, चांदोरी सायखेडासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साबुदाणा विक्रीसाठी असल्याचे दिसत आहे.
"गेल्या काही वर्षांपासून महाशिवरात्रीच्या पर्वावर निफाड तालुक्याच्या बाजारपेठांमध्ये ग्राहकांकडून साबुदाणा खरेदी होत असल्याने किराणा व्यावसायिक ग्राहकांसाठी साबुदाणा होलसेल दराने उपलब्ध करून देत आहे. हा साबुदाणा जिल्ह्यातील ग्राहकांसाठी पर्वणी ठरली आहे. यंदा साबुदाण्याचे वाढलेले दर आणि शेतीमालास मिळणारे दर यामुळे मार्केट काहीसे शांत आहे." - श्रीकांत श्रीवास्तव, किराणा व्यावसायिक, निफाड