NSK26H32296
मुंबई : मंत्रालयात मंगळवारी झालेल्या बैठकीला उपस्थित जलसंपदामंत्री गिरीश महाजन, विपणन मंत्री जयकुमार रावल, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी.
---
वीरचक प्रकल्पात आणणार तापी-बुराईचे पाणी
--
अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश; आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १३ : शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नंदुरबाच्या वीरचक प्रकल्पात तापी-बुराई प्रकल्पाचे पाणी आणण्याचा निर्णय मंत्रालयात मंगळवारी (ता. १३) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन अध्यक्षस्थानी होते. बैठकीत याबाबतचे अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यामुळे नंदुरबार शहराच्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
याबाबत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पाठपुरावा केला होता. मंत्रालयात झालेल्या बैठकीला पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तापी-बुराई प्रकल्पाचे पाणी बुराई नदीकडे वळविताना त्याच पाण्यातून ठाणेपाडा धरणही भरून घ्यावे, अशी मागणी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बैठकीत केली. या मागणीची दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यामुळे ठाणेपाडा धरणाच्या पाणीप्रश्न सुटणार आहे.
निंभेल, आसाणे, शनिमांडळ धरणांतही तापीचे पाणी
नंदुरबार तालुक्यातील निंभेल, आसाणे आणि शनिमांडळ या गावांमधील धरणांमध्येही तापी-बुराई प्रकल्पाचे पाणी लवकरात लवकर आणून स्थानिक पाण्याचा प्रश्न सोडविण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला. या भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी संबंधित योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यावर चर्चा झाली.
बिलाडी धरणग्रस्तांना घरकुल
बिलाडी धरणामुळे बाधित झालेल्या खामगाव येथील आदिवासी कुटुंबांच्या पुनर्वसनाचा मुद्दा बैठकीत उपस्थित झाला. या कुटुंबांना शबरी घरकुल योजनेतून घरे उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.