esakal | टार्गेट लसीकरण : लसीच्या उपलब्धतेवर ठरणार लसीकरणाची गती

बोलून बातमी शोधा

vaccination
टार्गेट लसीकरण : लसीच्या उपलब्धतेवर ठरणार लसीकरणाची गती
sakal_logo
By
कुणाल संत

नाशिक : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा १ मेची सुरवात टळली असली तरी नाशिक जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे लसीकरणाची आवश्‍यक ती सर्व तयारी केली आहे. मात्र आता लसीच्या उपलब्धेतवर जिल्ह्यातील लसीकरणाची गती ठरणार आहे. वेळेत व मुबलक लस मिळाल्यास जिल्ह्यात दीड महिन्यात सर्वांचे लसीकरण पूर्ण होईल, असे नियोजन विभागाकडून कळविण्यात आले आहे.

लसीच्या उपलब्धतेवर ठरणार लसीकरणाची गती

कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजविल्यानंतर राज्यात ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस दिली जात आहे. जिल्ह्यात आातापर्यंत एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के (सुमारे सात लाख) नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. मात्र आता हीच लसीकरण मोहीम राज्यात व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने नाशिक जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून लसीकरणाच्या दृष्टीने आवश्‍यक ते नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या नियोजनानुसार जिल्ह्यातील सर्व ११० प्राथमिक आरोग्य केंद्र व ५९२ उपकेंद्रांवर लसीकरण्याची तयारी करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांवर प्रत्येकी १०० नागरिकांना लस देण्यात येईल. लसीच्या उपलब्धतेनुसार उपकेंद्रावर व्यवस्था केली जाणार आहे.

आठवड्याला दोन लाख लसींची मागणी

जिल्ह्यात १८ ते ४५ वयोगटात महापालिका क्षेत्र वगळता अंदाजे १३ लाख नागरिक आहेत. त्यानुसार आरोग्य विभागातर्फे दर आठवड्याला सुमारे दोन लाख लोकांना लसीकरण करण्याच्या दृष्टीने तयारी करण्यात आली आहे. यासाठी आवश्‍यक मनुष्यबळाची तयारी विभागाने केली आहे.

विभागातर्फे करण्यात आलेली तयारी

प्राथमिक आरोग्य केंद्रे - ११०

उपकेंद्र - ५९२

वैद्यकीय अधिकारी - २००

समुदाय वैद्यकीय अधिकारी - ३२२

आरोग्यसेविका - ४५०

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आवश्‍यक ती सर्व तयारी आरोग्य विभागाने केली आहे. वेळप्रसंगी मनुष्यबळाची गरज भासल्यास कंत्राटी तज्ज्ञ घेऊन लसीकरण केले जाईल. वेळेत व मुबलक लस मिळाल्यास जिल्ह्यात सुमारे दीड ते दोन महिन्यांत लसीकरण पूर्ण करू शकतो.- डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्याधिकारी, जि. प. नाशिक