टीडीआर आणि शेतजमिनीच्या
व्यवहारात अडीच कोटींची फसवणूक
गुंजाळ कुटुंबातील तिघांविरुद्ध मुंबई नाका पोलिसांत गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१७ : महापालिका हद्दीतील मिळकतींचे टीडीआर क्षेत्र आणि शेतजमीन विक्रीचे आश्वासन देत बांधकाम व्यावसायिकासह त्यांच्या भागीदाराची तब्बल २ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पैसे स्वीकारूनही अंतिम डीआरसी प्रमाणपत्र आणि खरेदीखत न दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश सहदेवराव सोनवणे (वय ५५) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. मुक्ताजी सखाराम गुंजाळ, मनिषा मुक्ताजी गुंजाळ आणि संपदा मुक्ताजी गुंजाळ अशी संशयितांची नावे आहेत. फेब्रुवारी २०२३ मध्ये संशयितांनी सोनवणे आणि त्यांचे भागीदार अथर्व राजेश सोनवणे यांच्याशी मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू केला होता.
महापालिका हद्दीतील काही मिळकतींचे अंतिम टीडीआर क्षेत्र उपलब्ध करून देण्यासह शेतजमीन विक्री करण्याचे आश्वासन देत संशयितांनी दोघांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर व्यवहाराच्या मोबदल्यात वेळोवेळी २ कोटी ६० लाख रुपये स्वीकारले. मात्र, रक्कम घेऊनही संबंधित मिळकतींचे अंतिम डीआरसी प्रमाणपत्र आणि शेतजमिनीचे खरेदीखत देण्यात आले नाही.
फेब्रुवारी २०२३ ते १६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत वारंवार पाठपुरावा करूनही आवश्यक कागदपत्रे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे सोनवणे यांच्या लक्षात आले. अखेर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस हवालदार वाय. के. डंबाळे करीत आहेत.