मालेगावात शिक्षकांना कृतिशील प्रशिक्षण
----------------------------------
वरिष्ठ वेतनश्रेणी, निवड श्रेणीसाठी आवश्यक
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव शहर, ता.१५: पहिली ते बारावीला अध्यापन करणाऱ्या तालुक्यातील शिक्षकांचे दहा दिवसांचे वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण सुरू आहे. मन्सुरा कॅम्पस येथे वरिष्ठ श्रेणीचे ३३१ शिक्षक तर एटीटी हायस्कूल येथे १६६ शिक्षक निवड श्रेणीसाठी कृतिशील प्रशिक्षण घेत आहेत.
बारा वर्षे सेवाकाळ पूर्ण केलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ मिळण्यासाठी, तर चोवीस वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ मिळण्यासाठी हे प्रशिक्षण आवश्यक आहे. विशेष म्हणजे सदर प्रशिक्षण दिवाळी सुट्टीत घेऊ नये यासाठी सर्व शिक्षक संघटनांनी कंबर कसून विरोध केला मात्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व डाएट यांच्या माध्यमातून नियोजनानुसार १३ नोव्हेंबरला राज्यभरात एकाच वेळी प्रशिक्षण सुरू झाले. २२ नोव्हेंबरपर्यंत हे प्रशिक्षण चालणार आहे. दोन्ही प्रशिक्षणात वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. अध्ययन-अध्यापनातील नवनवीन धोरणांचा यात समावेश आहे. या प्रशिक्षणाचे समन्वयक डाएटचे अधिव्याख्याता भालचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २६ सुलभक मार्गदर्शन करत आहेत. या सुलभकांमध्ये किरण केदार, नीलिमा देसले, प्रशांत कुलकर्णी, प्रवीण शिंदे, अतीक अहमद सौद अहमद, अन्सारी ओसामा, लुब्ना मुर्तुजा, सुयोग बाविस्कर, परवेज खान, मोहम्मद जब्बार,
रहमानी अय्युब, मिस्बाह अहमद, दत्तात्रय कापसे, गणेश साळी, महेश बाविस्कर, पुरुषोत्तम पगारे, योगेश अमृतकर यांचा समावेश आहे.
प्रशिक्षण मूल्यांकन व अंमलबजावणी
सकाळी साडेनऊ ते साडेपाच अशी प्रशिक्षणाची वेळ आहे. सहा वेळा उपस्थिती नोंदवून सायंकाळी ऑनलाइन अपडेट करून पुणे येथे कळवण्यात येत असल्याने ऐन दिवाळीच्या सुट्टीत गुरुजींना प्रशिक्षण घ्यावे लागत आहे. या प्रशिक्षणाचे दोनशे गुणांचे मूल्यमापन होणार असून शंभर गुण आवश्यक आहेत.