Nashik News : बदलीच्या प्रतीक्षेतील शिक्षकांचा हिरमोड; संवर्ग चारची यादी प्रसिद्ध होईना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher transfers

Nashik News : बदलीच्या प्रतीक्षेतील शिक्षकांचा हिरमोड; संवर्ग चारची यादी प्रसिद्ध होईना

नाशिक : जिल्ह्यांतर्गत ऑनलाइन शिक्षक बदलीप्रक्रियेत संवर्ग चारच्या शिक्षक बदल्यांची यादी सोमवारी (ता. ६) प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत याद्या प्रसिद्ध झालेल्या नव्हत्या.

दुसरीकडे नाशिक वगळता इतर जिल्ह्यांतील याद्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. बदलीप्रक्रियेतील गोंधळ संपत नसल्याचे त्यामागचे कारण असून, त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांचा हिरमोड झाला आहे. (Teachers Awaiting Transfer list of category four will not be published Nashik News)

संवर्ग एक अंतर्गत ४५८, शिक्षकांची बदली झाली आहे. या शिक्षकांना १८ फेब्रुवारीला आदेश प्राप्त होणार होते. परंतु, राज्य सरकारने ही मुदत वाढवून ३० एप्रिल ते ३० मे २०२३ केली आहे. उन्हाळी सुटीत एकाच वेळी शिक्षकांना बदली आदेश प्राप्त होतील. संवर्ग दोन अंतर्गत पती-पत्नी एकत्रीकरण केले जाते. यात ३० किलो मीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या २०४ शिक्षकांची बदली झाली आहे.

जिल्ह्यांतर्गत ऑनलाइन शिक्षक बदलीप्रक्रियेत संवर्ग चारच्या बदल्या करण्यासाठी निर्धारित वेळेत अर्ज भरण्यात आले. त्यानंतर प्रक्रिया राबविण्यात मुदतवाढ देण्यात आली होती. सहा दिवस मुदतवाढ झाल्यानंतर ६ फेब्रुवारीला बदलीपात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली जाणार होती.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

प्रत्यक्षात सोमवारी रात्री उशिरापर्यंत देखील नाशिक जिल्ह्यातील याद्या प्रसिद्ध होऊ शकलेल्या नाहीत. दुपारी बारानंतर बदल्यात काही तांत्रिक बाबी दुरुस्ती करून अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल, असे कळविण्यात आले.

परंतु सायंकाळपर्यंत या जिल्ह्यांमधील देखील बदल्यांची यादी प्रसिद्ध झालेल्या नाहीत. याद्या प्रसिद्ध न झाल्याने बदल्यांची प्रतीक्षा असलेल्या शिक्षकांमध्ये नाराजी परसली होती.

"संवर्ग चारमधील शिक्षक बदल्यांची यादी प्रसिद्ध होणार होती. परंतु, संगणकीय प्रक्रियेने काम सुरू असल्याने विभागाकडून शिक्षणाधिकारी लॉगिंग प्राप्त झालेला नाही. तो प्राप्त झाल्यानंतर याद्या प्रसिद्ध होतील. नाशिक वगळता इतर जिल्ह्यांतील याद्या घाईघाईत डाउनलोड करण्यात आलेल्या आहेत. यात अनेक तांत्रिक दुरुस्त्या असल्याने त्या देखील बदलण्यात येत आहेत. त्या याद्या देखील प्रसिद्ध झालेल्या नाहीत." - धनंजय कोळी (उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद)