विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शिक्षकांनी योगदान द्या
डॉ.अशोक उईके : शिक्षकांना नियुक्ती आदेशांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२४ : आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत त्यांचे शैक्षणिक भवितव्य घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. पवित्र पोर्टलद्वारे पारदर्शक प्रक्रियेद्वारे नियुक्त झालेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित भावनेने कार्य करावे, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले. नियुक्तीच्या ठिकाणी पूर्णवेळ वास्तव्यास राहून विद्यार्थ्यांना नियमित व दर्जेदार शिक्षण द्यावे, अशाही सूचना त्यांनी केल्या.
पेठरोडवरील एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलमध्ये शनिवारी (ता.२४) आदिवासी विकास विभागात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नवनियुक्त शिक्षकांशी डॉ. उईके यांनी संवाद साधला. यावेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, आमदार किशोर दराडे, आमदार हिरामण खोसकर, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, अपर आयुक्त दिनकर पावरा, प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे, उपायुक्त संतोष ठुबे आदी उपस्थित होते.
मंत्री उईके म्हणाले की, आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासह त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी आणि त्यांना प्रगतीच्या व्यापक संधी उपलब्ध करून देण्यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडेही शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना उईके यांनी केल्या. खासदार भगरे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातील विविध आदिवासी आश्रमशाळांमध्ये नियुक्त झालेल्या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले.
जबाबदारी स्वीकारावी : उईके
शिक्षकांनी नियुक्तीकडे केवळ नोकरीची संधी म्हणून न पाहता आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी म्हणून पाहावे. विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान, आवश्यक शैक्षणिक सुविधा आणि प्रभावी अध्यापन उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांनी आपल्या ज्ञानाचा व कौशल्यांचा उपयोग करावा. या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांचे सामूहिक दायित्व महत्त्वाचे असल्याचे डॉ. उईके यांनी सांगितले.
सुप्तगुणांना वाव द्यावा : झिरवाळ
मंत्री झिरवाळ यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, कौशल्ये व महत्त्वाकांक्षा विकसित करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता ओळखून त्याला प्रोत्साहन दिल्यास तो जीवनात प्रगती करू शकतो. त्यामुळे शिक्षकांनी अध्यापनापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना वाव द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
फोटो क्रमांक :- एच-33479