शिक्षक पतसंस्थेच्या ठेवी परत करण्याची मागणी
प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे निवेदन
नामपूर, ता. १६ : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहकारी पतसंस्था व ठेवीदारांच्या अडकलेल्या ठेवी तातडीने परत कराव्यात, अन्यथा बँकेच्या नाशिक येथील मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नामपूर येथील बागलाण प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सभापती सिकंदर पवार, उपाध्यक्ष काशीनाथ सूर्यवंशी व संचालक मंडळाने निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनाचा आशय असा ः जिल्हा बँकची आर्थिक स्थिती खालावली असून, अनेक सहकारी पतसंस्थांच्या मुदत ठेवी, रिझर्व्ह फंड तसेच चालू व करंट खात्यांतील कोट्यवधींची रक्कम दीर्घकाळापासून अडकलेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्था आर्थिक अडचणीत आहेत. बागलाण प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची सुमारे दोन कोटींची रक्कम दहा वर्षांपासून अडकली असल्याने सभासदांना वेळेवर कर्जवाटप करणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक सहकारी संस्थांनी आपले आर्थिक व्यवहार राष्ट्रीयीकृत बँकांकडे वळविले असून, जिल्हा बँकेने कर्जवसुली मोहिमा, मालमत्ता लिलाव आणि इतर उपाययोजनांतून मोठ्या प्रमाणात वसुली करूनही ठेवीदारांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळालेली नाही. नामपूर विभागात मोसम खोऱ्यातील ५५ गावांचा समावेश असून, नामपूर, आसखेडा, जायखेडा, निताणे, ताहाराबाद, मुल्हेर आदी ठिकाणी जिल्हा बँकेच्या शाखांचा समावेश आहे. शहरात १६ सहकारी तत्त्वावरील पतसंस्था असून, दहा वर्षात आर्थिक आणीबाणी, बँकेने गमावलेला विश्वास, यामुळे जिल्हा बँकेबद्दल नाराजी आहे. नामपूर परिसरातील सहकारी पतसंस्थांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे सुमारे पाच कोटी अडकले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
....................
कोट
शिक्षक सहकारी पतसंस्थेचे जिल्हा बँकेत चालू, बचत खाते असून, बँकेकडे एक कोटी ५५ लाखांची ठेव आहे. तसेच रिझर्व्ह फंडात ४३ लाख ५० हजार रुपये जमा आहेत. पतसंस्थेच्या सभासदांना मुलांच्या शैक्षणिक कामासाठी, लग्नकार्यासाठी, आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज आहे. बँकेने तातडीने पैसे न दिल्यास विद्यमान संचालक मंडळ उपोषणास करणार आहे.
-देवीदास पवार, तालुकाध्यक्ष, बागलाण तालुका प्राथमिक शिक्षक संघ