धुळे टुडे २ साठी...
---
शिक्षकांना ऑनलाइनची सक्ती;
आधी मोबाईल-इंटरनेट सुविधा द्या
---
भाजप शिक्षक आघाडीची मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १५ : शिक्षकांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविण्याचा शासनाचा निर्णय प्रभावीपणे राबवायचा असेल तर प्रत्येक शाळेला आवश्यक पायाभूत डिजिटल सुविधा उपलब्ध करून देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व संबंधित शाळांना स्वतंत्र मोबाईल संच, नियमित इंटरनेट आणि तांत्रिक सहाय्य पुरवावे तसेच, यासाठी स्वतंत्र निधीची कालबद्ध तरतूद करावी, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
शासनाच्या डिजिटल उपक्रमांना शिक्षकांचा विरोध नाही. मात्र, अंमलबजावणीपूर्वी आवश्यक साधनसामग्री देणे गरजेचे आहे. राज्यातील अनेक शाळांमध्ये मोबाईल संच, पुरेसे इंटरनेट व डिजिटल साधने उपलब्ध नाहीत. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागांतील शाळांसमोर ही अडचण गंभीर रूप धारण करू शकते. शासकीय कामकाजासाठी शिक्षकांनी स्वतःचा मोबाईल, वैयक्तिक इंटरनेट आणि स्वखर्चाची साधने वापरावीत, ही अपेक्षा अन्यायकारक आहे. त्यामुळे ऑनलाइन उपस्थिती लागू करण्यापूर्वी शाळांना सुविधा द्याव्यात. अंगणवाडी केंद्रांच्या धर्तीवर राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, शासकीय व अनुदानित शाळांना स्वतंत्र मोबाईल आणि नियमित इंटरनेट उपलब्ध करून द्यावे. मोबाईल खरेदी, रिचार्ज व देखभालीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद करून स्पष्ट कार्यपद्धती ठरवावी, अशी मागणी आघाडीने केली आहे.
शिक्षकांना दोषी धरू नका
सर्व्हर डाऊन, नेटवर्क समस्येमुळे ऑनलाइन उपस्थिती न नोंदवली गेल्यास शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करू नये. शिक्षकांचा मुख्य वेळ हा विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आहे, प्रशासकीय कामात तो वाया जाऊ नये, असे निवेदनात नमूद केले आहे. भाजप प्रदेश निमंत्रित सदस्य महेश मुळे, ज्येष्ठ नेते भरतसिंह भदोरिया, प्रदेश सदस्य डॉ. नितीन कापडीस, मनोहर चौधरी, अविनाश पाटील, जितेंद्र कागणे, रोहिणी मुळे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन दिले.
---