नव्या आधार प्रणालीच्या तांत्रिक बिघाडाने नागरिक त्रस्त
जिल्ह्यातील ३० ते ४० टक्के केंद्रे बंद; नोंदणी, अद्ययावतीकरणाचे काम रखडले
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : आधार प्राधिकरणाने जुनी प्रणाली बंद करून आधार नोंदणी व अद्ययावतीकरणासाठी नवीन पोर्टल सुरू केले आहे. मात्र, नवीन प्रणाली वारंवार बंद पडत असल्याने जिल्ह्यातील आधार केंद्रांवरील कामकाज विस्कळित झाले आहे. जिल्ह्यातील पाचशेहून अधिक केंद्रांपैकी अंदाजे ३० ते ४० टक्के केंद्रे तांत्रिक अडचणींमुळे बंद असल्याने नागरिकांसह केंद्रचालकांचीही गैरसोय होत आहे.
महसूल प्रशासनातर्फे आधार अद्ययावतीकरणासाठी विशेष मोहीम राबविली जात असतानाच नवीन प्रणालीतील तांत्रिक अडचणी वाढल्या आहेत. पोर्टल सुरू होण्यास विलंब होणे, दुरुस्तीच्या वेळी सर्व्हर पुढे न सरकणे तसेच वारंवार प्रणाली बंद पडणे, अशा समस्यांना केंद्रचालकांना सामोरे जावे लागत आहे.
आधार अद्ययावत असणे विविध शासकीय योजनांचा लाभ, शैक्षणिक प्रवेश आणि रोजगाराशी संबंधित प्रक्रियांसाठी आवश्यक ठरत आहे. त्यामुळे आधार केंद्रांवर नागरिकांची गर्दी होत असताना प्रणालीतील बिघाडामुळे तासन्तास प्रतीक्षा करूनही काम न होताच परतावे लागत आहे.
पोर्टल वारंवार हँग
केंद्रचालकांच्या म्हणण्यानुसार, आधारचे सॉफ्टवेअर वेळेत सुरू होत नाही. सुरू झाल्यानंतर नाव किंवा पत्त्यात दुरुस्ती करताना सर्व्हर अडकतो. पोर्टल हँग झाल्यानंतर पुन्हा लॉगइन करावे लागते आणि त्यासाठी नव्याने ओटीपी घ्यावा लागतो. त्यामुळे एका नागरिकाचे काम पूर्ण करण्यासाठीही बराच वेळ लागत असून, अनेकांना काम न होताच परतावे लागत आहे.