33469
पुणे : राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या आढावा बैठकीत पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल. शेजारी अधिकारी.
--
दोंडाईचा होणार सुगीपश्चात तंत्रज्ञानाचे केंद्र
पालकमंत्री रावल : राष्ट्रीय संस्थेचे उपकेंद्र; खानदेशातील शेतकऱ्यांना दिलासा
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २४ : शेतमालाची काढणीनंतर होणारी नासाडी रोखणे, उत्पादनाचा दर्जा टिकविणे आणि योग्य मूल्यवर्धनातून शेतकऱ्यांना अधिक चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी धुळे जिल्ह्यात महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहे. मॅग्नेट २.० प्रकल्पाच्या माध्यमातून दोंडाईचा येथे राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेचे उपकेंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे धुळे जिल्ह्यासह संपूर्ण खानदेशातील शेतकऱ्यांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि आधुनिक प्रक्रिया पद्धतींचे प्रशिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध होईल, अशी माहिती पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
पुणे येथे राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेचा प्रगत देशांच्या धर्तीवर अत्याधुनिक विकास करण्यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री रावल यांनी ही घोषणा केली. आधुनिक कृषी पणन व्यवस्थेत शेतमालाची काढणीनंतरची योग्य हाताळणी, साठवणूक, प्रतवारी, अत्याधुनिक प्रक्रिया, आकर्षक पॅकेजिंग आणि मूल्यवर्धन या बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. या क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण सुविधा खानदेशातील शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी दोंडाईचा येथील प्रस्तावित उपकेंद्र मैलाचा दगड ठरेल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे काढणीनंतर होणारे शेतमालाचे नुकसान टळेल, उत्पादनाचा दर्जा टिकून राहील आणि बाजारात शेतकऱ्यांना अधिक चांगला दर मिळण्यास मदत होईल, असा विश्वास पालकमंत्री रावल यांनी व्यक्त केला.
-
कृषी उद्योजकांसाठी संधी
या उपकेंद्राच्या माध्यमातून केवळ पारंपरिक शेतकरीच नव्हे, तर शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी पदवीधर तरुण तसेच कृषी प्रक्रिया उद्योगांशी संबंधित घटकांना आधुनिक सुगीपश्चात तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेता येणार आहे. शेतमाल प्रक्रियेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, कृषी प्रक्रिया उद्योगांना गती देणे आणि स्थानिक स्तरावरच आवश्यक कौशल्ये निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे पणनमंत्री रावल यांनी स्पष्ट केले.
-
स्थानिक पातळीवरच प्रशिक्षणाची सोय
मॅग्नेट २.० प्रकल्पांतर्गत कृषी पणन क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण यंत्रणा अधिक मजबूत करण्याचे नियोजन आहे. दोंडाईचा येथे हे उपकेंद्र सुरू झाल्यानंतर धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी पुणे किंवा इतर दूरच्या शहरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. स्थानिक पातळीवरच जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने खानदेशात कृषी प्रक्रिया उद्योगांचा विस्तार वेगाने होईल, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.