अल्पवयीन मुलीवर अत्याचार;
आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २९ : नांद्रा बुद्रुक (ता.जि. जळगाव) परिसरातील गिरणा नदीपात्रात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून व्हॉट्सॲपवर व्हॉइस क्लीप व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोषारोप सिद्ध झाल्याने आरोपीला ७ वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंड ठोठावला. हा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी दिला.
नांद्रा बुद्रुक येथील गिरणा नदीपात्रात पवन कैलास सोनवणे (वय १९, रा. नांद्रा बुद्रुक) याने अल्पवयीन पीडितेशी प्रेमसंबंध असल्याचे मोबाईल व इंटरनेट आणि व्हॉट्सॲपवर व्हायरल करून समाजात बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला होता. याबाबत पीडितेच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
आठ साक्षीदारांच्या साक्ष
तपासी अधिकारी गणेश चव्हाण यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षी नोंदविण्यात आल्या. यात पीडिता व फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. चारुलता राजेंद्र बोरसे यांनी काम पाहिले, तर पैरवी अधिकारी म्हणून अमोल पाटील यांनी सहकार्य केले.
चौकट
न्यायालयाचा निकाल
सरकारी वकिलांचा प्रभावी युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी पवन कैलास सोनवणे याला दोषी ठरविले. त्यानुसार आरोपीस ७ वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंड ठोठावला, तसेच भादंवि कलम ५०६ अन्वये एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.