Winter Temperature : भौगोलिक रचनेमुळे द्राक्षपंढरी नेहमीच गारठलेली! हवेची घनताही जास्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shekoti

Winter Temperature : भौगोलिक रचनेमुळे द्राक्षपंढरी नेहमीच गारठलेली! हवेची घनताही जास्त

निफाड (जि. नाशिक) : महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया आणि द्राक्षनगरी असलेल्या निफाड तालुक्यात हाडे गोठवणारी थंडी पडत असते. राज्यात शीतलहर आली, की निफाडचा पारा वेगाने शून्य अंशाच्या दिशेने सरकतो. डिसेंबर-जानेवारीत तर अनेकदा शेत, झाडाझुडपांवर दवबिंदू गोठल्याचे दिसते.

संपूर्ण राज्यात विक्रमी थंडी निफाड परिसरातच का पडते, हा सर्वांसाठी कुतूहलाचा विषय आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी निफाडची भौगोलिक रचना समजून घेणे गरजेचे आहे. (temperature nashik below average compared to other places in winter season nashik news)

नाशिक शहराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला निफाड तालुक्याचा विस्तार झाला आहे. गोदावरी, कादवा, वडाळी, बाणगंगा अशा नद्यांचा हा परिसर. नांदूरमध्यमेश्वर धरणाचा विस्तीर्ण जलाशयही याच परिसरात. संपूर्ण तालुका ऊस, द्राक्ष, कांदा, गहू, मका, सोयाबीन, टोमॅटो या पिकांमुळे बारमाही बागायती झाला आहे.

तालुक्यात सर्वत्र शेततळे, विहिरी, कालवे आणि उपसा जलसिंचन यामुळे वर्षभर जमिनीत पाणी मुरते. उन्हाळ्यातही येथील बागायती हिरवी ठेवण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे. हवामान थंड असल्याने बाष्पीभवनाचा वेगही इतर भागांच्या तुलनेत कमी असतो. या ठिकाणची मातीसुद्धा पाणी धरून ठेवणारी असल्याने दीर्घकाळ ओल टिकून राहतो.

या सर्व परिस्थितीमुळे अन्य ठिकाणांपेक्षा येथील उष्णतामान सरासरीपेक्षा कमी आहे. निफाड तालुक्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ५६९ मीटर आहे. संपूर्ण प्रदेश सखल असून, कोणत्याही डोंगर पर्वतरांगा येथे नाहीत.

हवेची घनताही जास्त आहे. त्यामुळे जास्त दाबाचा प्रदेश तयार होऊन तापमान कमी होते. मात्र निफाडच्या या तापमानाचा द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसतो. तर गहू आणि हरभरा या पिकांसाठी थंडी पोषक असल्यामुळे परिसरात गव्हाचे आणि हरभऱ्याचे उत्पन्न जोमदार येते.

सध्या बदलत्या पीक पॅटर्ननुसार द्राक्षशेती मोठ्या प्रमाणात होत आहे. वाढत्या थंडीचा फटका बसून द्राक्ष उत्पादनात घट होते. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मुंबई-पुण्याच्या लोकांसाठी गुलाबी असणारी थंडी मात्र निफाडच्या द्राक्ष उत्पादकांसाठी जीवघेणी ठरते.

"हवामानातील निश्चित बदलाचा भौगोलिक विचार करता कादवा-गोदावरी नद्यांचा जलाशय अन् द्राक्ष, कांदा, गहू, सोयाबीन, मका यांसारख्या पिकांना नियमित पाणी दिल्याने सर्वत्र गारवा टिकून राहतो यातूनच हवेत थंडावा निर्माण होत असावा." - ॲड. रामनाथ शिंदे

निफाड ः थंडीपासून बचाव करण्यासाठी परिसरात अशा प्रकारच्या शेकोट्या नेहमी पेटविल्या जातात.

Remarks :

के