बाजारदिनी टाळे ठोकणार

बाजारदिनी टाळे ठोकणार
Published on: 
आठवडे बाजारदिनी टाळे ठोकणार धुळे बाजार समिती कारभाराविरूद्ध ठाकरे सेनेचा इशारा सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १६ : बाजार समितीच्या आवारात गोवंश तस्करी व बेकायदेशीर खरेदी-विक्रीचे प्रकार उघडकीस येऊनही मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. गैरप्रकारांना आळा घालण्याऐवजी शेतकऱ्यांचा जनावरांचा बाजार बंद पाडण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप करत मंगळवारी (ता. १७) आठवडे बाजाराच्या दिवशी बाजार समितीला टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा या पक्षाने दिला आहे. बाजार समितीमधील गैरप्रकारांना आळा घालून शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी शेतकरी, पशुपालक व शिवसेनेच्या (उबाठा) कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, निंबा मराठे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, तेजस गोटे, प्रशांत भदाने, तालुकाप्रमुख हेमराज पाटील, बाबाजी पाटील आदींनी केले आहे. प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले, की बाजार समिती आवारात २० मे २०२५ ला १२७ जनावरांची कत्तलीतून सुटका करण्यात आली होती. त्यानंतर ३ नोव्हेंबर २०२६ ला पुन्हा ८० ते १०० गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली. पशुधन चोरी, तस्करी, बोगस पावत्या आणि संशयास्पद वाहतूक प्रकरणी केवळ वाहनचालक किंवा लहान व्यक्तींवर कारवाई केली जात असून, आर्थिक लाभ लाभार्थी आणि मुख्य सूत्रधारांना अभय दिले जात असल्याचा आरोप आहे. गोवंश तस्करीला आळा घालण्याच्या नावाखाली सर्वसामान्य शेतकरी, पशुपालक आणि कायदेशीर व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांचा जनावरांचा बाजार उद्धवस्त करण्याचा प्रयत्न काही घटकांकडून होत असल्याचा संशय आहे. व्हायरल ऑडिओ क्लिप्स आणि गंभीर आरोप समोर येत असतानाही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळ आपली भूमिका स्पष्ट का करत नाहीत, असा प्रश्‍न आहे. त्यामुळे संबंधित कर्मचारी, व्यापारी, दलाल आणि वाहतूकदारांच्या भूमिकेची सखोल चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.