
शिक्षकांनी मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे सरकारला अपेक्षित आहे.
शैक्षणिक परिसरात थुंकण्यास प्रतिबंध! उल्लंघन झाल्यास होणार दंड
नाशिक: कोरोनाबाधित व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास त्याचा इतरांना त्रास होऊ शकतो. शिवाय क्षयरोग आणि अन्य आजारांची लागण इतरत्र थुंकल्याने होऊ शकते. म्हणूनच शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी (ता. ५) शैक्षणिक संस्थांच्या परिसरात थुंकण्यास प्रतिबंध केला. शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात. त्यामुळे शिक्षकांनी मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे सरकारला अपेक्षित आहे.
शिक्षकांकडून सूचनांचे उल्लंघन झाल्यास २०० रुपये दंड वसूल करायचा आहे. वारंवार असे घडल्यास बाराशे रुपयांचा दंड आकारायचा आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची मूल्ये रुजवण्यासाठी शिक्षकांनी सामाईक प्रार्थनेच्या शेवटी आणि शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता विषयाचे महत्त्व पटवून द्यायचे आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन कालावधीत ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे.
ऑनलाइन वर्ग सुरू होण्यापूर्वी थुंकल्याने होणाऱ्या आजाराची माहिती द्यायची आहे. स्वच्छतेच्या मूल्यांसाठी प्रोत्साहित करायचे आहे. विद्यार्थ्यांना सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने होणाऱ्या आरोग्यविषयक संसर्गाविषयी स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मार्गदर्शन करायचे आहे. स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे आहे.
सामान्य व्यक्तींनाही दंड
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे ही पालकांसोबत सामान्य नागरिकांचीही जबाबदारी आहे. सामान्य व्यक्तींकडून सूचनांचे उल्लंघन झाल्यास २०० रुपये दंड वसूल करायचा आहे. असे वारंवार घडल्यास बाराशे रुपयांचा दंड आकारून वसूल करायचा आहे. दंड वसूल करण्याचा अधिकार मुख्याध्यापक तथा प्राचार्यांना सरकारने दिला आहे. सूचनांच्या नियमित देखरेखीची जबाबदारी संस्थाप्रमुख अथवा प्रमुखांनी नेमलेल्या शिक्षकांची असेल.