

मालेगाव : शहर व परिसरात गेल्या महिन्यापासून चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. चोरीचे प्रकार वाढतानाच आता चोरट्यांचे धाडसही वाढले आहे. चोरट्यांनी आपला मोर्चा थेट यंत्रणेकडेच वळवला आहे.
शहरातील तहसील कार्यालय, प्रांताधिकाऱ्यांचें निवासस्थान व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालय आवारात चोरीचे प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी या तीन वेगवेगळ्या चोरीच्या प्रकारात एक लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. (Theft at residence of Tehsil Office Provinces Increased courage of thieves Nashik Crime)
येथील तहसील कार्यालय इमारतीतून निवडणूक शाखेचे नायब तहसीलदर तथा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या निवडणूक शाखेच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी लिनोवा व डेल या दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे सुमारे ९५ हजार रुपये किमतीचे दोन संगणक चोरुन नेले.
नायब तहसीलदार वरदा सोमण (५२, रा. शांतिनिकेतन कॉलनी, गंगापूर रोड) यांच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
प्रांतांच्या निवासस्थान आवारातून चोरी
येथील तहसील कार्यालयाजवळ साठफुटी रस्त्यानजीक असलेल्या प्रांताधिकारी नितीन सदगीर यांच्या शासकीय निवासस्थान तसेच त्याला लागून असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय आवारातून चोरट्यांनी चंदनाच्या झाडांची लाकडे चोरून नेली.
प्रांताधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या आवारातून ६ हजार रुपये किमतीचे ८ ते ९ वर्षे वयाचे चंदनाचा झाडाचा आतील भाग, तर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय आवारातून ५ हजार रुपये किमतीचे चंदनाचे झाड व सरकारी गिरणा विश्रामगृह आवारातून ६ हजार रुपये किमतीचे चंदनाच्या झाडाचा आतील भाग असा एकूण १७ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केले.
शनिवारी रात्री व रविवारी (ता. २६) सुटीची संधी साधून हे चोरी, घरफोडीच्या घटना घडल्या. या प्रकरणी दादाजी शिरसाठ यांच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चोरी, घरफोडींची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपअधीक्षक पुष्पराज सूर्यवंशी, कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा जाधव आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या चोरी, घरफोड्यांचा तपास लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. दरम्यान प्रांताधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या आवारातून यापूर्वीही चंदनाच्या झाडाची चोरी झालेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.