Theft on Wani Gad : सप्तशृंगगडावर भाविकांचे 5 लाखांचे दागिने लंपास | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wani gad news

Theft on Wani Gad : सप्तशृंगगडावर भाविकांचे 5 लाखांचे दागिने लंपास

नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्ताने सप्तशृंगीगडावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे, दुसरीकडे या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भाविकांच्या दागिन्यांवर हातसफाई सुरू केली आहे. रविवारी (ता.२) सुट्टीमुळे भाविकांची गर्दी झाल्याने चोरट्यांनी तब्बल ५ लाखांचे दागिने लंपास केले असून याप्रकरणी कळवण पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Theft on Vani Gad Jewels worth 5 lakh stolen from Saptashrungi gad Nashik crime Latest Marathi News)

हेही वाचा: ‘Screen Time’ वाढल्याने ‘Brainfog’चा धोका!; आरोग्‍यावर होतायत गंभीर परिणाम

नवरात्रौत्सवानिमित्त आणि रविवारी (ता.२) सुटी असल्याने सप्तश्रृंगीदेवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक आले होते, नांदुरी बसस्थानकावर भाविकांची एकच गर्दी झाली होती. त्याचाच फायदा घेत चोरट्यांनी दिवसभरात दहा भाविकांकडील सोन्याचे दागिने, मोबाइल व रोकड असा पाच लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

सचिन सदाशिव चित्ते (रा. सटाणा) यांच्या फिर्यादीनुसार ते दर्शनासाठी गडावर जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना चोरट्याने गर्दीचा फायदा घेत सचिन यांच्यासह इतर भाविकांकडील ९५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, २५ हजार रुपयांचे दोन मोबाइल व पाच हजार रुपयांची रोकड असा एकूण तीन लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

डोंबिवली येथील रहिवासी सुदाम अरुण चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने गर्दीचा फायदा घेत तीन तोळे वजनाची सोन्याची चेन चोरून नेली. धुळे येथील रहिवासी अंजना शामकांत पाटील यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने अंजना यांच्याकडील दोन तोळे वजनाची पोत चोरून नेली. कळवण पोलिस ठाण्यात चोरीचे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा: Adimaya- Adishakti : पंच तुरेवाले देवी मंदिर