esakal | वाढत्या मृत्युदराने दहावा, तेरावा एकत्र करण्याकडे कल

बोलून बातमी शोधा

Dashkriya

वाढत्या मृत्युदराने दहावा, तेरावा एकत्र करण्याकडे कल

sakal_logo
By
दत्ता जाधव

पंचवटी (नाशिक) : कोरोनामुळे जिल्ह्यासह शहरातील मृत्युदरात मोठी वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक व्यक्ती त्यात बळी पडत असल्याने अनेकांचा दशक्रिया व तेराव्याचा विधी एकत्र करण्याकडे कल वाढला आहे. मात्र या दोन्ही विधींचे स्वतंत्र महत्त्व असल्याने दशक्रिया विधीनंतर किमान दुसऱ्या दिवशी तेराव्याचा विधी करावा, असे मत गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या अध्यक्षांनी व्यक्त केले आहे.

गत वर्षी मर्यादित स्वरूपात असलेल्या कोरोनाने आता गल्लीबोळांत अन्‌ घराघरांत थैमान घातले आहे. केवळ ज्येष्ठच नव्हे, तर अनेक कुटुंबातील तरुणांचाही त्यात मोठ्या प्रमाणावर बळी जात आहे. त्यामुळे रामकुंडावर दशक्रिया विधींच्या संख्येत कधी नव्हे इतकी वाढ झालेली आहे. मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत हे विधी होत असले तरी एकाच कुटुंबातील कर्तीसवरती माणसे यात बळी जात आहे. अनेक ठिकाणी तर एकाचा दशक्रिया होण्यापूर्वीच कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीचाही त्यात बळी जात असल्याचे धक्कादायक प्रकार वाढत आहे. त्यामुळे दशक्रिया विधीतच तेराव्याचा विधी करण्याकडे कल वाढला आहे.

दोन्ही विधींचे स्वतंत्र महत्त्व

दशक्रिया विधी हा काही प्रमाणात सार्वजनिक स्वरूपातील विधी आहे. तर तेरावा हा घरगुती म्हणजे घरातच करण्याचा विधी आहे. हिंदू धर्मात या दोन्ही विधींचे स्वतंत्र महत्त्व सांगितले आहे. त्यामुळे दशक्रिया विधीतच तेराव्याचा विधी उरकणे चुकीचे आहे. एखाद्या व्यक्तीच्या दशक्रिया विधीनंतर तिसऱ्या दिवशी हा विधी होणे आवश्‍यक आहे, मात्र ते शक्य नसल्यास किमान दशक्रिया विधीच्या दुसऱ्या दिवशीतरी हा विधी करावा, असे मत गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश कुलकर्णी यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

टोप्या मिळणे दुरापास्त

हिंदू धर्मियांत दशक्रिया विधीच्या वेळी घरातील व्यक्ती आणि भाऊबंद मुंडण करतात. या मुंडण केलेल्या व्यक्तींना टोप्या व टॉवेल देण्याची प्राचीन परंपरा आहे. परंतु किराणा मालाप्रमाणे टॉवेल, टोप्या या अत्यावश्‍यक व गरजेच्या वस्तू नसल्याने प्रशासनाने या व्यवसायास मज्जाव केला आहे. त्यामुळे टॉवेल, टोप्या मिळणे अवघड झाले आहे. इतर अनेक व्यवसायांप्रमाणेच या व्यवसायावरही गंडांतर आल्याची भावना अनेक टोपीविक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, यावर शक्कल लढवत अनेकांनी घरातील जुन्या व न वापरलेल्या टोप्याच संबंधितांना देणे सुरू केले आहे.