शिरपूर तालुक्यात
तिसरा बिबट्या जेरबंद
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. ७ : तापी काठावरील शेतकऱ्यांसह पश्चिम भागात धुमाकूळ घालणारा तिसरा बिबट्याही वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी (ता. ६) रात्री अडकला. त्यामुळे परिसरात दहशत पसरविणाऱ्यांपैकी एकूण तीन बिबटे जेरबंद झाले आहेत. आणखी काही बिबट्यांचा वावर असल्याच्या शंकेच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची शोध मोहीम सुरू आहे.
बोराडी वनक्षेत्रातील वासर्डी परिमंडलात अर्थे बुद्रुक शिवारात ९ सप्टेंबरला रात्री साडेसातला बिबट्याने दोन वर्षांच्या बालकाला जबड्यात धरून नेले होते. या घटनेनंतर बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले. अर्थे बुद्रुक, भरवाडे, टेंभे, टेकवाडे, खामखेडा, नवे लोंढरे, जुने लोंढरे, वरखळ, विखरण, नवे व जुने भामपूर, जळोद आदी परिसरात बिबट्याचा शोध सुरू होता. २ ऑक्टोबरला पांडुरंग माळी यांच्या शेतात घराजवळ ट्रँक्विलायझर गनद्वारे बिबट्याला डार्ट करून बेशुद्ध करून ताब्यात घेतले.
परिसरात बिबट्यांचा वावर असल्याची शक्यता गृहित धरून वन विभागाने पिंजरे मात्र कायम ठेवले. त्यात बिबट्यासाठी आमिष म्हणून भक्ष्य ठेवण्यात आले. ५ ऑक्टोबरला भरवाडे (ता. शिरपूर) शिवारातील पिंजऱ्यात बिबट्याची पूर्ण वाढ झालेली मादी जेरबंद झाली. पाठोपाठ ६ ऑक्टोबरला अर्थे शिवारातील पिंजऱ्यात सुमारे दीड वर्ष वयाचा बिबट्या जेरबंद झाला. एकाच कुटुंबातील मादी व तिची दोन पिले असल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, या परिसरात आणखी काही बिबटे आहेत का याचा शोध वन विभागाने सुरू ठेवला आहे. मुख्य वनसंरक्षक मोहन नाईकवाडी, उपवनसंरक्षक राजेंद्र सदगीर, विभागीय वन अधिकारी राहुल घरटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी किरण गिरवले, विशाल दुराने, सुनील जोग, भूषण वाघ, योगेश वारुळे यांच्यासह शिरपूर उपवन विभागातील वनपाल, वनरक्षक, वनमजूर व वाहनचालकांनी कारवाईत भाग घेतला.