esakal | विषबाधेमुळे साठवण तलावात हजारो मासे मृत; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Thousands of fish died

तलावात काही अज्ञातांकडून विषबाधेचा प्रयोग करण्यात आला असावा, असा नागरिकांचा आरोप आहे.

विषबाधेमुळे साठवण तलावात हजारो मासे मृत

sakal_logo
By
राम शिंदे

सर्वतीर्थ टाकेद (जि. नाशिक) : खेडभैरव हद्दीतील लघुपाटबंधारे विभागाच्या योजनेंतर्गत असलेल्या तलावात तीन दिवसांत हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. सर्वत्र तलाव परिसरात तलावाच्या पाण्याच्या कडेला रोहू, कटला, कोंबडा, चिलापी या माशांच्या प्रजातींचे हजारो मासे मृतावस्थेत पडून मोठी दुर्गंधी पसरली आहे. या तलावात काही अज्ञातांकडून विषबाधेचा प्रयोग करण्यात आला असावा, असा येथील नागरिकांचा आरोप आहे. (Thousands of fish died due to poisoning in the storage pond)

लाखोंचे आर्थिक नुकसान

माहिती ग्रामपंचायतीला मिळताच पंचनामा केला. याबाबत मत्स्यपालन व्यवसाय, नाशिक सहाय्यक आयुक्त अधिकारी, तहसीलदार, घोटीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांना कारवाईसाठी पत्र दिले आहे. स्थानिक केशव विठ्ठल पडवळे यांना मत्स्यव्यवसायासाठी तलाव पाच वर्षे करारनामा करून दिला आहे. तलावात व तलावाच्या कडेला पाचशे ग्रॅमपासून ते दोन-तीन किलोचे हजारोंच्या संख्येने मासे मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. दिवसेंदिवस मासे मरण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे तलावाच्या कडेला मृत माशांचे ढीग तयार झाले आहेत. सर्पदेखील मृत्युमुखी पडल्याने तलावात विषबाधा झाल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हे दुर्गंधीयुक्त पाणी कोणीही पिण्यासाठी वापरू नये व कोणत्याही कामासाठी वापर करू नये, अशी सूचना ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांना केली आहे. यामुळे पडवळे यांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले. पडवळे यांच्यासह सहभागी भागीदारांवर कर्जबाजारी होण्याची वाईट वेळ आली आहे. नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केशव पडवळे, गोरख पगारे, जालिंदर पडवळे, बाळकृष्ण भागडे यांनी केली आहे. शासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी पोलिसपाटील अंकुश वाजे, सरपंच लहानूबाई कचरे, गोविंद धादवड, खंडेराव जाधव, भास्कर वाजे यांनी केली आहे.

हेही वाचा: 20 स्कोअर असतानाही 80 वर्षांचे आजोबा ठणठणीत!

''पाच वर्षांसाठी लिलाव पद्धतीने करारनामा करून खेड ग्रामपंचायतीकडून ताब्यात घेतला होता. चार भागीदार मिळून आतापर्यंत कर्जबाजारी होऊन १४-१५ लाख रुपये खर्च केला. विषबाधेमुळे तलावातील सर्व मासे मृत्युमुखी पडले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला.''
-केशव पडवळे

''अज्ञात समाजकंटकांनी तलावात विषप्रयोग करून सर्व मासे मारल्याचे समजते. यामुळे स्थानिक युवकांच्या व्यवसायास धोका निर्माण झाला आहे.''
-हरी वाजे, शिवसेना उपतालुकाप्रमुख

(thousands of fish died due to poisoning in the storage pond)

हेही वाचा: शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रश्नावर उदयनराजे घेतील निर्णय ?