‘तोच चंद्रमा नभात’ भावगीतांची मैफल
------
उपस्थितांची भरभरून दाद; वनिता विश्व महिला मंडळातर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.८ : येथील वनिता विश्व महिला मंडळातर्फे ‘तोच चंद्रमा नभात…’ या विशेष सुरेल भावगीतांच्या कार्यक्रम नुकताच झाला. रात्रीच्या चंद्रप्रकाशात मराठी व हिंदी सिनेगीत, भावगीतांच्या सुमधुर स्वरांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमात ‘माय भवानी तुझे लेकुर’, ‘मेरी आवाज ही पहचान है’, ‘तोच चंद्रमा नभात’, ‘रात का समा’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘झाल्या तिन्ही सांजा’, ‘पल पल दिल के पास’, ‘गुनगुना रहे हैं भँवरे’, ‘ये समा समा है प्यार का’, ‘आ के तेरी बाहों में’, ‘दिल तो पागल है’, ‘रहे ना रहे हम’, ‘तेरे बिना जिंदगी से’, ‘हे चांदणे फुलांचें शिंपीत रात्र आली’ आणि ‘चंद्र आहे साक्षीला’ अशा लोकप्रिय गीतांची सुरेल मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळाली.
विविध गीतांमधून भक्तिभाव, प्रेम, विरह, आठवणी व भावबंधांचे विविध रंग उलगडले. जुन्या अजरामर गीतांनी उपस्थितांना जुन्या आठवणींच्या विश्वात रमवले. संगीताच्या माध्यमातून मनामनांना जोडणारी ही मैफल उत्साहपूर्ण वातावरणात रंगली.
या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, कलाकार विद्या भंगाळे व सहकलाकार, मंडळाच्या पदाधिकारी व सदस्य भगिनी, रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ज्योती साळी यांनी केले. दीपा देशपांडे यांनी आभार मानले.
---------